तुळजापूर , दि. १८ :

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याची बुद्धी महाराष्ट्र सरकारला मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पुजारी मंडळाच्या वतीने सोमवारी (दि.18) कुलस्वामिनी श्री  तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले. महाद्वारसमोरील कासवाचे पूजन करुन महाआरती करुन सरकारला सदबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करण्यात आली.


छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. परंतु शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव, ज्वारी, तूर. सोयाबीनचा प्रश्न, पशुधनाचा प्रश्न, दुधाला दरवाढ, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्या आहेत. 


पावसाने ओढ दिल्यामुळे  पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम मिळणे अपेक्षित होते. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील सरकार हे मोसमाप्रमाणे बदलत आहे. एका वर्षात चारवेळा सरकार बदलत आहे. म्हणून शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्याची सदबुद्धी सरकारला द्यावी, यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घातल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सांगितले. यावेळी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनीही सरकारच्या धोरणावर  टिका केली.

 
Top