साश्रूनयनांनी गौराईला निरोप; ग्रा.प. कर्मचारी अनिल बनसोडे यांच्या गौरी पुढे आकर्षक रोषणाई
काटी, दि. २४ :उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरातील सावरगाव, केमवाडी, वडगाव (काटी), तामलवाडी, खुंटेवाडी, पांगरधरवाडी, जळकोटवाडी, आदी गावात मोठ्या आनंदाने गौरी आगमनाचे स्वागत करण्यात आले होते. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरी म्हणजे माहेरवाशिण घरी येते अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे मंगळवार दि.19 रोजी गणपतीच्या जल्लोषपुर्णआगमना नंतर गुरुवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले.गौरी साधारणपणे तीन दिवस असतात. पहिला दिवस आगमनाचा, दुसरा पूजनाचा आणि तिसरा विसर्जनाचा. बाप्पांच्या आगमनानंतर उत्सवातील महत्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरीचे आगमन व पुजन. भाद्रपदातील ज्येष्ठा-कनिष्ठा गौर ही माहेरवाशीण म्हणुन ओळखली जाते.शिवप्रिया पार्वती ही गौरीच्या रुपाने येते व तिच्या आगमनावेळी धन-धान्याची आरास असल्याने गौराई सोन्याच्या, मोत्याच्या पावलांनी घरात प्रवेश करते असं मानलं जातं त्यामुळे परिसरात मोठय़ा भक्तीभावाने गौरीचे स्वागत करण्यात आले होते.
गौरींचे मुखवटे, दागिने, साड्या, मखर व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी व लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी, प्रतिष्ठापणेची सजावट व पुजन करण्यासाठी घरोघरी लगबग सुरु होती.
कौटुंबिक परंपरेनुसार काहींनी गौरीच्या मुखवट्यांना झळाळी दिली. यंदा प्रथमच घरी गौरीचे आगमन झालेल्या कुटुंबियांनी नवीन मुखवटे खरेदी केले.काटी येथील प्रसिद्ध अमोल कुंभार व श्रीकांत कुंभार या बंधूंच्या श्री आर्टमधून अनेकांनी मुखवटे, खेळणी व सजावटीचे साहित्य खरेदी केली होती.
गावातील काही व्यापारी, शेतकरी यांनी झेंडू, गुलाब, शेवंती आणि जरबेरा या सारखी फुले विक्रीसाठी आणली होती. दरम्यान, घरोघरी विधीवत महालक्ष्मी (गौरी) प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी गौरीच्या निरोपाचा दिवस होता. गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आलेल्या माहेरवाशिण गौरींना साश्रूनयनांनी गौराईला निरोप देण्यात आला.
महालक्ष्मी प्रतिष्ठापना व सजावट यांचे वेगळे समीकरण आहे. सोने-चांदीची नवीन मंगळसूत्रे, कमरपट्टा, बाजूबंद व इतर दागिन्यानी गौरी लक्ष्मीस सजवण्यात आले होते. तर लक्ष्मी समोर पायर्या तयार करून विविध प्रकारचे फराळाचे साहित्य, विविध प्रकारची खेळणी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
काटी येथील ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनसोडे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री उशिरा पर्यंत जागून लक्ष्मी समोर अतिशय आकर्षक मांडणी आरास सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अनिल बनसोडे यांच्या गौरी लक्ष्मी समोर आकर्षक विद्युत रोषणाई व दोन्ही बाजूला मनी प्लॅंन्टमधून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. दिवसभर महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम चालला होता. तसेच गणपती बाप्पासमोरील मांडलेली खेळणी लहान बालके खेळणी पहाण्याचा आनंद घेत होते.