मुरूम शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी साखळी उपोषण.                 

मुरूम, दि. २८ : 


महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ही मागणी करत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे ता.२५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुरूम शहरातील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी (ता.२८) रोजी  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांना पाठिंबा देण्याकरिता साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. उपोषणकर्ते रजनीकांत वाघ, महादेव शिंदे, प्रभाकर माने, अजित चौधरी, भगत माळी, दादा बिराजदार यांनी १२ तासाच्या आमरण उपोषणास बसले  आहेत. 


या उपोषण स्थळी शहरातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते. बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी यावेळी उपोषण कर्त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  आंदोलनास सुरुवात केली. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे मत आंदोलकांनी मांडले. मराठा समाज गेले अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गांनी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत आहे. मात्र शासनाने अद्याप आरक्षणाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा समाज आंदोलनात उतरला आहे. शासनाने वेळेत दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.    

 
Top