अनाधिकृतरित्या पाणी उपसा करणा-यांविरुद्ध कडक कारवाई करा , संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिका-यांचे निर्देश
धाराशिव दि.११
जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने, पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त असलेल्या प्रकल्पातून अनाधिकृतरित्या पाणी उपसा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पाटबंधारे विभाग व तालुकास्तरीय मंडळाच्या भरारी पथकांकडून अनाधिकृतरित्या पाणी उपसा करणा-यांविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले.
जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
जिल्हयात कमी पावसामुळे पाणीटंचाई उदभवण्याची शक्यता विचारा घेता शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या अनुषंगाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना डॉ.ओम्बासे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
या आढावा बैठकीत जिल्हयात शहर व ग्रामीण भागात संभाव्य पाणी टंचाईच्या संदर्भात आवश्यक ते नियोजन करून पाणी टंचाईच्या अनुषंगाने संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त असलेल्या प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा, पाण्याचे वार्षीक नियोजन,पाणी आरक्षण तसेच प्रकल्पातील पाण्याच्या संदर्भात नागरीक,शेतकरी व लोकप्रतिनिधी यांचेकडून प्राप्त होणारे अर्ज व निवेदन या अनुषंगीक बाबींच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून त्याबाबत आढावा घेण्यात आला.तसेच यावेळी संभाव्य पाणी टंचाईबाबत संबंधित कार्यालय प्रमुख यांना आवश्यक सुचना देवून टंचाईच्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन करण्याबाबत डॉ.ओम्बासे यांनी निर्देशीत केले.
संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने ३१ जूलै २०२४ रोजी असणाऱ्या पाणी टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्या जलस्त्रोताचे उध्दभवावर अवलंबून असणा-या गावांची पिण्याच्या पाण्याची आवश्यकता तसेच त्या जलस्त्रोताचे उदभवाच्या परीघातील इतर जलस्रोताचे उदभवातील पाण्याचा साठा इत्यादी बाबी गृहीत धरून त्याच्या दुप्पट पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवणे आवश्यक आहे. हा आरक्षीत पाणीसाठा तसेच त्या जलस्त्रोताचे उदभवावर अवलंबून असणा-या पाणी पुरवठयाच्या योजनांसाठी लागणारा पाणी पुरवठा तसेच बाष्पीभवनातून होणारी हानी इत्यादी अत्यावश्यक बाबी वगळता जर त्या प्रकल्पातील पाण्याचा साठा या प्रकल्पाच्या एकूण साठवण क्षमतेच्या ३३ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अशा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देता येणार नाही याबाबत सुचना देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यासाठी केलेले आरक्षण ज्या उदभवावर अवलंबून असणा-या पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणारा पाणीसाठा तसेच बाष्पीभवनातून होणारा अपव्ययाचा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचा असेल तर ३३ टक्के पाणीसाठयाच्या मर्यादेच्या अधिन राहून उर्वरित पाणीसाठा सिंचनासाठी उपलब्ध करून दयावा किंवा कसे याबाबत कालवा सल्लागार समितीकडे अभिप्राय आणि आदेशास्तव अशी प्रकरणे सादर करण्यात यावीत.असेही डॉ ओम्बासे यावेळी म्हणाले.
या प्रक्रीयेच्या सुलभीकरणासाठी धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.१, चे नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता श्री.मदने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्राप्त होणारे अर्ज व निवेदने उचित कार्यवाहीसाठी नोडल अधिकारी यांचेकडे पाठविण्यात यावे.अर्ज व निवेदने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीच्या समोर सादर करावीत. कालवा सल्लागार समिती बैठकीला सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.
या बैठकीला कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग क्र.२, उमरगा,कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद, सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी यांचेसह संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी हे उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी यवेळी दिले.