मागचा इतिहास विसरून गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी नव्याने एकोप्याने राहावं
:- जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांचे आवाहन
कानेगाव येथे बौद्ध समाज मंदिराचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते लोकार्पण
लोहारा , दि. २५ :
तालुक्यातील कानेगाव येथील नागरिकांनी मागचा इतिहास विसरून गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी नव्याने एकोप्याने राहावं, गावात कायमस्वरूपी शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
तालुक्यातील बौद्ध समाजाच्या समाजमंदिराचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्री. ओंबासे हे ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, उमरग्याचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी शितल खिंडे-पवार, लोहारा पोलीस निरीक्षक अजित चिंतले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर. सी. चव्हाण,दत्तात्रय माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, उपसरपंच आशा कदम, ग्राम पंचायत सदस्य यशवंत माने, लैला कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील कानेगाव येथील बौध्द समाज मंदीराचा वाद गेल्या अनेक वर्षापासून चिघळला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन व यामध्ये स्वतः लक्ष घालून वाद मिटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. प्रशासनाने विवादित बौद्ध विहाराच्या समोर पोलीस चौकी साठी आरक्षित जागेपैकी कांहीं जागा बौद्ध समाज मंदिराला दिली आहे. त्या जागेवर बौद्ध समाज मंदीराचे बांधकाम करण्यात आले आहे. या समाज मंदिराचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. श्री. ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. श्री. ओंबासे म्हणाले की, कानेगावच्या दोन्ही गटांनी आपसी मतभेद बाजूला ठेवून एकमेकांशी सुसंवाद निर्माण व्हावा. केवळ विरोधासाठी विरोध करण्यात वेळ वाया घालवू नये. या समाज मंदिराला ग्रंथालयात रूपांतरीत करावे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके ठेवावे. हे समज मंदिर सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी खुले असावे, हिच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल. त्यातून ज्ञानार्जन व विकास दोन्ही साधावे असे आवाहन केले.
यावेळी पंकज काटे, रमाकांत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विजय बनसोडे, उदय बनसोडे, मेसा जानराव, मुकेश मोटे, हुंकार बनसोडे, प्रा. सुधाकर गायकवाड यांच्यासह लोहारा, आरणी, कानेगाव, नागुर, कास्ती, यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी माने, सागर माने, मनोज गायकवाड, दत्तात्रय माने, विलास कांबळे, बळवंत कांबळे, धनराज कांबळे, जोतिबा सोनवणे, यांच्या सह आदींनी पुढाकार घेतला.