मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे याकरिता महामार्गावर रास्ता रोको आंदोलन ,जवळपास एक तास रास्ता रोको , मातंग समाजातील नागरिक पिवळा ध्वज घेऊन आंदोलनात दाखल
नळदुर्ग ,दि.०३
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह इतर मागण्यांकरीता शनिवारी नळदुर्ग शहरात महामार्गावर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बसस्थानकासमोर दुपारी साडेबारा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नळदुर्ग व परिसरातील लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते व पदाधिका-यानी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोर जमा झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले .यामुळे जवळपास एक तास रास्ता रोको करण्यात आले.
यामुळे महामार्गावर जवळपास दिड ते दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी आंदोलनकर्त्यांना लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख सुधाकर पाटोळे व प्रदेश सचिव दिलीप गायकवाड, सुनील खवळे, विजय क्षिरसागर, सुरेश भिसे, रामजी गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले.
आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार एस. आर. ढवळे यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती मध्ये वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करावे. नळदुर्ग येथील साठे नगर येथील रहिवाशी जमीन त्यांच्या नावे करून घरकुल योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी सपोनि स्वप्निल लोखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाचे प्रास्ताविक विजय क्षिरसागर तर आभार दिलीप गायकवाड यांनी केले.