खरीप २०२२ मधील उर्वरित ५० टक्के, २३२ कोटी रुपये पिक विम्याची रक्कम वाटपास सुरुवात

लोहारा , दि.२०

         खरीप २०२२ मधील उर्वरित ५० टक्के अर्थात २३२ कोटी रुपये पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने आनंद होत आहे. मात्र आदेशाची अर्धीच अंमलबजावणी होत असून पंचनामाच्या प्रति व बाद केलेल्या १ लाख ४५ हजार पूर्वसूचनाच्या फेर सर्वेक्षणासाठी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय कृषी पीक विमा कंपनी विरुद्ध  आर. आर.सी  कारवाईचा आग्रह धरणार असल्याची माहिती खरीप २०२२ याचिका कर्ते, सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
         

 श्री. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले की, सन २०२२ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख ६८ हजार ४५३ अर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला होता. अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्व सूचना दिल्या. यामध्ये जिल्ह्यातील ५ लाख ८९ हजार २२६ शेतकऱ्यांनी पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी १ लाख ४५ हजार पूर्व सूचना बाद केल्या. मात्र सोयाबीन पिकासाठी आलेल्या २ लाख ६३ हजार ६५६ पूर्व सूचना काढणी कालावधीच्या पंधरा दिवसाच्या पूर्वी म्हणजे १५ ऑक्टोबर पूर्वी प्राप्त झाल्या असल्याने त्यांना केंद्रीय मार्गदर्शक सूचनातील २१.५.१० चा मुद्दा लागू होत नव्हता. मात्र भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने केवळ ५० टक्के रक्कम वाटप केली होती. 
        
 याविरुद्ध शेतकरी अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय कृषी विभागाकडे अपील दाखल केले होते. दोन्ही निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागले मात्र कंपनी प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर श्री. जगताप यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली ३० ऑगस्ट २०२३ रोजी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने २९४ कोटी रक्कम पंचनामेच्या प्रति व बाद केलेल्या १ लाख ४५ हजार पुर्व सूचनाच्या फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले. ही सर्व प्रक्रिया एक महिन्याच्या आत पार पाडावी असेही कंपनीला आदेशित केले गेले होते. परंतु ३ महिन्याचा कालावधी लोटून ही कंपनी पैसे देत नव्हती. म्हणून शेवटी याचिका कर्ते श्री. जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरला जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर तीन नोटीसा दिल्या मात्र कंपनीने कसलाच प्रतिसाद दिला नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी आर. आर. सी. ची कारवाई करत कंपनीचे खाते सीज करून प्रॉपर्टी अटॅच केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या कंपनीच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून २५ जानेवारीपर्यंत पैसे देण्याचे मान्य केले. मात्र तत्पूर्वीच (दि.१९) पैसे बँकेकडे जमा केले व ती शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे.



पंचनामेच्या प्रती व बाद पूर्व सूचनाबाबत पुन्हा जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे कंपनीविरुद्ध आर आर सी कारवाई बाबत जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे आग्रह धरणार.

पिक विमा कंपनीने सर्व पंचनामे डुप्लिकेट तयार केले असून तक्रार निवारण समितीच्या बैठकीत कृषी अधीक्षक यांनी माहिती अधिकारात ज्या शेतकऱ्यांनी प्रति उपलब्ध करून घेतले आहे. त्यावर कृषी सहाय्यक यांची डुप्लिकेट स्वाक्षरी असल्याचे स्पष्ट पणाने सांगितले आहे. तसेच शेतकऱ्याच्या हातात पंचनामाच्या प्रति पडल्यावर धक्का बसत आहे. सर्व माहिती पुन्हा भरलेली आहे खऱ्या व योग्य पंचनामाच्या प्रति हातात आल्यानंतर शेतकऱ्याला मिळणारी रक्कम ही जवळपास ७०० कोटी इतकी असणार आहे. तसेच बाद केलेल्या १ लाख  ४५ हजार पूर्व सूचना फेर सर्वेक्षण केल्यानंतर आकडा खूप मोठा होणार आहे. तसेच गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील ५३ हजार २० शेतकऱ्यांना केवळ १ हजार पेक्षा कमी रक्कम मिळाली आहे. यासाठी देखील आदेश झालेले असताना कंपनीने केवळ रक्कम दिली आहे. आदेशाची अर्धवट अंमलबजावणी केलेली आहे. म्हणून पुन्हा मंगळवारी जिल्हाधिकारी यांना भेटून कंपनीविरुद्ध पुन्हा आर.आर.सी कारवाई करण्याबाबत आग्रह धरणार असल्याचे श्री जगताप यांनी म्हंटले आहे.





खरीप २०२२ मधील उर्वरित २९४ कोटी रुपये वाटप होणार आहेत याचा मनातून आनंद आहे. मात्र पंचनामाच्या प्रति व बाद पूर्व सूचनाबाबत अंमलबजावणी होत नाही. त्यासंदर्भात कंपनीविरुद्ध पुन्हा आर.आर.सी कारवाई करणे बाबत मंगळवारी जिल्हाधिकारी धाराशिव यांना भेटून विनंती करणार आहे.



अनिल जगताप, खरीप २०२२ पिक विमा याचिका कर्ते
 
Top