लोहारा तालुक्यात वेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा , दि.११
शहरासह संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचा अतिशय महत्वाचा सण असलेला वेळा अमवस्या (येळवस) हा सण पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सगळीकडे शेतशिवार माणसाच्या गर्दीने फुलून गेली होती. तर उमरगा- लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सपत्निक उमरगा येथील त्यांच्या शेतात कुटुंबियांसह पांडवाचे पुजन करुन वेळ अमावस्या साजरी केली.
शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काळ्या आईची पुजा करण्यासाठी पहाटे डोक्यावर अंबिलचे बिंदगं (लहान माठ) घेऊन कोणी चालत तर कोणी दुचाकी चारचाकीतून शेतात जाऊन पाच पांडवांची सहकुटुंबियासह मनोभावे पुजा केली. त्यानंतर शेतातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, भुईमूग यासह आदी पिकामध्ये अंबिल शिंपडून हर बोलो, हर बोलो च्या गगनभेदी घोषणांनी शेतशिवार दणाणून सोडला होता.
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बीची पेरणी अतिशय कमी झाली आहे. दुष्काळाची गडद छाया असनातही शेतकऱ्यांनी यंदाची येळवस मोठ्या उत्साहात साजरी केली. ज्वारी व बाजरीच्या पिठापासून बनवलेले उंडे, चपाती, ज्वारी व बाजरीच्या कडक भाकरी, गव्हाची खिर, अनेक हिरव्या भाज्यांपासून बनवलेली स्वादिष्ट भजी, गूळ व शेंगदाण्यापासून बनवलेल्या कुंदीच्या पोळ्या, तुप, अंबिल वरण भात, यासह आदी स्वादिष्ट बनवलेल्या पदार्थ वर शेत शिवारात निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा मनस्वी आनंद लुटला. वेळ आमवस्या असल्याने शहरासह ग्रामीण भागात सकाळी ९:३० वाजेपर्यंत कांहीं दुकाने उघडली होती. दहानंतर दुकाने बंद करुन आपल्या स्वतःच्या व मित्राच्या शेतीकडे व्यापारी गेल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.