भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या स्मारकासाठी 100 एकर जमीन शासनाने संपादित करावी - केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले
पुणे, दि.०२
दि.१ भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभा जवळची शंभर एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून येथे शौर्याची प्रेरणा देणारे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे.त्यासाठी राज्य सरकार 500 कोटींच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटुन लवकरच पत्र देणार असल्याचे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
भीमा कोरेगाव लढाई चा इतिहास हा पूर्वाश्रमीच्या महार पूर्वजांच्या अतुलनीय शौर्याचा प्रेरणादायी इतिहास आहे.हा इतिहास डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दाखवून आमच्यातील शौर्याचा क्रांतीचा निखारा जागृत केला आहे. तीच शौर्याची; क्रांतीची ; संघर्षाची प्रेरणा घेऊन जीवनात मार्गक्रमण करण्याचा आमचा आजचा नवीन वर्षाचा संकल्प आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
आंबेडकरी जनतेच्या वतीने दरवर्षी 1 जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला भेट देऊन विनम्र अभिवादन करतात. त्यासाठी येथे जागा अपुरी पडत आहे.या परिसरातील 100 एकर जमीन राज्य शासनाने संपादित करून भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक विजय स्तंभाचे भव्य आंतररष्ट्रीय स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने रु.500 कोटी च्या निधीची तरतूद केली पाहिजे. असे ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन केल्या नंतर पत्रकारांनी विविध प्रश्न विचारल्या नंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छा ही ना.रामदास आठवले यांनी दिल्या. 2024 हे नवीन वर्ष विकासाचे आणि निवडणुकीचे वर्ष आहे.या वर्षात दलित आदिवासी ज्येष्ठ नागरिक; तृतीयपंथी; दिव्यांग सर्व नागरिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. प्रधान ना. मंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे विकासाचे वर्ष ठरणार आहे.ना.मोदींच्या नेतृत्वात सर्वांना न्याय मिळत आहे. नव्या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री ना. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एन डी ए 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास ना. आठवले यांनी व्यक्त केला.