नळदुर्ग शहरासह तुळजापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरी धरणात ६ टक्के  पाणी साठा ; गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता


धरणातील मासेमारी बंद करून पाण्याची चोरी थांबविण्याची नगरपालिकेची मागणी


नळदुर्ग , दि.२३

   श्री क्षेत्र तुळजापूरसह नळदुर्ग शहर व इतर गावांना येथील बोरी (कुरनूर मध्यम प्रकल्प)  धरणातून पाणीपुरवठा केला जातो.  या धरणात गुरुवार रोजी  6 फूट एवढे अत्यल्प पाणी साठा पिण्या योग्य  आहे. तरीही बोटीचा वापर करुन परप्रांतीय मजुराकडून मासेमारी जोमाने सुरू असून पाणी ढवळत असल्याने पिण्याचे पाणी दूषित होत असून तात्काळ मासेमारी बंद करण्याचे पत्र नगरपरिषदेने संबंधित विभागाला दिले आहे.

तुळजापूर, नळदुर्ग व अणदूर सह अन्य चार गावांतील जवळपास दीड लाख नागरिकांची पाण्याची तहान भागविणाऱ्या येथील बोरी धरणात केवळ 6 टक्के पेक्षा कमी जीवंत पाणी साठा असल्याने भविष्यात गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


नळदुर्ग येथील बोरी धरणाची साठवण क्षमता 35. 28 दशलक्ष घनमीटर असून यात 2.98 दलघमी मृतसाठा असून आज रोजी धरणात केवळ 6.07 दलघमी उपयोगी जलसाठा आहे. या धरणा अंतर्गत  तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर, चीकुंद्रा, मुर्टा व श्री तुळजाभवानी साखर कारखान्याकरीता योजना कार्यरत आहेत.


या धरणातून दररोज 0.15 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा होत आहे. पाटबंधारे विभाग व महावितरण कंपनी या धरणाकडे लक्ष देत नसल्याने अद्याप काही शेतकरी पाणी उपसा करीत आहेत तर पाटबंधारे विभाग अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने बोटीने मासेमारी जोरात चालू आहे. मासेमारी मुळे पाणी गढूळ होत असून शहरातील गढूळ पाणी पुरवठा होत आहे. याची दखल   घेऊन नगरपालिकेने  गुरुवार दि. २३ रोजी पाटबंधारे विभागाला पञाव्द्रारे पाणीचोरी व मासेमारी थांबविण्याचे  सांगितले आहे.

सुनिल गव्हाणे, बीआरएस जिल्हा सोशल मिडिया प्रमुख

अगोदर धरणावरील मासेमारी बंद करायला लावणे गरजेचे आहे,  रोज चार बोटी पाण्यात उतरून मासेमारी करत आहे. त्यामुळे या मृत साठ्यातील पाणी ढवळून गढूळ होत आहे. त्यामुळे पिण्या योग्य पाणी शहराला मिळत नाही

 
Top