विद्यार्थ्यांनी शिवबाचा आदर्श समोर ठेवण्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या रेखा पवार यांचे आवाहन
नळदुर्ग ,दि.१९ एस.के.गायकवाड
विद्यार्थ्यांनी रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून आपला सर्वांगीन विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिग्रेडरच्या रेखाताई पवार यांनी बहुजन हिताय वसतिगृह उमरगा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी बहुजन हिताय विद्यार्थी वसतीग्रह उमरगा, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई पवार यांचे विशेष व्याख्यान विद्यार्थी व उपस्थितांच्या समोर झाले.याप्रसंगी त्यांनी शिवरायांच्या जीवनचरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात एकाच देवाची पूजा झाली पाहिजे ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज, ते आमचे खरे आराध्य दैवत आहे. जिजाऊंच्या उदरातुन झेपावलेला हा तेजस्वी प्रखर स्वाभिमानी प्रकाश महाराष्ट्रासह संबंध देशाला गुलामीतून मुक्त करीत उंच आकाशाच्या दिशेने गुलामीच्या अंधार चिरीत होता व प्रत्येक क्षितिजावर भगवा फडकवीत होता आणि सर्व प्राणिमात्र एक असून कुणालाही दुसऱ्यावर अत्याचार करता येणार नाहीत आणि अशी डरकाळी फोडली की जर कुणी असे करील तर गाठ भवानी तलवारीशी आहे.आजही आपल्याला ही तलवार ललकारीत आहे. महाराजांचे बुद्धिमानता , दुरदृष्टेपणा , चाणाक्षपणा कठोर परिश्रम, कुशल संघटक आणि गनिमी काव्याने काम करण्याची हातोटी हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत, आज आपणास पुन्हा एकसंघ रयतेचा आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमच्यातील शिवबा मशालीसारखा तेवत ठेवा असे आवाहन ही शेवटी त्यांनी केले.
याप्रसंगी संस्कार पवार आणि लक्ष्मण दुधभाते या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड चे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व कार्यकर्त्या उपस्थित होते .
प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ,संत तुकाराम महाराज साहित्य परिषद लातूरचे अध्यक्ष डॉ.हणमंत पवार, श्रीमती रेखाताई पवार, सतीश पवार, साधनाताई पवार, राऊबाई भोसले, सत्यवती इंगळे , मंजुषा चव्हाण, देशमुख ताई , सुलभाताई जाधव, कल्पना कलशेट्टी, उषाताई पवार , राऊताई पाटील, भारत कापसे, सुधीर माने , अमर कोथिंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक वसतिगृहाचे अधिक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी केले तर सूत्रसंचलन वसंत पासेमे यांनी आणि आभार प्रदर्शन वसतीगृहाचा विद्यार्थी लक्ष्मण दूधभाते यांनी केले.याप्रसंही वसतिगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य भेट देन्यात आले.