नळदुर्ग येथे "मराठी भाषा गौरव दिन " उत्साहात साजरा
वागदरी(एस.के.गायकवाड)
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणातील शिक्षकांच्या वतीने कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि . वा .शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन "मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करण्यात आला .
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक , सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे .एक आधुनिक श्रेष्ठ मराठी कवी , नाटककार ,कादंबरीकार , म्हणून त्यांची ख्याती आहे . 'कुसुमाग्रज 'या टोपण नावाने त्यांनी लेखन केले .प्रसिद्ध साहित्यिक वि .स . खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक म्हणून ओळखले जातात .मराठी साहित्यामध्ये विपुल लेखन करून साहित्याचे दालन अधिक समृद्ध करणारे कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो . याचाच भाग म्हणून नळदुर्ग येथे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण समारोप व मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम घेण्यात आला . प्रारंभी कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर विद्यालयाचे उपप्राचार्य गोपाळ कुलकर्णी जि .प . कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांची उपस्थिती होती . यावेळी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणातील सुलभक प्रा . डॉ .प्रशांत भागवत , शिवशंकर जळकुटे ,दत्ता राऊत , प्रा .बालाजी गायकवाड , भारत जाधवर , बाबासाहेब अंकुशे ,तंत्रस्नेही विजयकुमार मर्डे , सहनियंत्रक सत्तेश्वर जाधव ,यांचा भैरवनाथ कानडे लिखित " नोबेल विजेते भारतीय " हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन प्रशिक्षणार्थींच्या वतीने सत्कार करण्यात आला .याप्रसंगी मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्यावर ज्येष्ठ मराठी विषय शिक्षक शिवशंकर जळकोटे प्रा . डॉ .प्रशांत भागवत यांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धाराशिव जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य भैरवनाथ कानडे यांनी तर सूत्रसंचालन प्रविण गुरव व आभार कमलाकर वाघमारे यांनी मानले .कार्यक्रमास मकरंद पाटील , सुभाष गळाकाटे , प्रदीप तलमोडे ,महादेव बागडे ,प्रदीप बिराजदार , आदींसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .