लेव्हीची साखर खुल्या बाजारात विकल्याने
श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या दृष्टी शुगरचे अशोक जगदाळे यांच्या मालमत्तेवर बोजा
नळदुर्ग ,दि.१६:
दृष्टी शुगरचे अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेऊन गळीत हंगाम २०१०-११ व २०११-१२ मधील दोन वार्षातील शासनास द्यायची ४ कोटी ९८ लाख ९३ हजार ४५० रूपये किमतीची लेव्ही साखर परस्पर विकली. या संदर्भात उच्च न्यायालय छ. संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग (रूरल) व अलियाबाद येथील मालमत्तेवर वसुलीसाठी बोजा चढवला आहे. अशी माहिती तुळजाभवानी कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी पञकार परिषदेत दिली.
दृष्टी शुगरचे अशोक हरिदास जगदाळे यांच्या नळदुर्ग व अलियाबाद येथील मालमत्तेवर जिल्हा महसूल प्रशासनाने बोजा चार कोटी अठ्यान्नव लाख त्र्यान्नव हजार चारशे पन्नास रूपयेचा बोजा घेतल्याने खळबळ
उडाली आहे.
दृष्टी शुगरने हंगाम मध्ये 2010 मध्ये सहा वर्षांच्या कालावधी करीता येथील श्री तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला होता. दरम्यान हंगाम 2010-11 व 11-12 सालातील शासनास देय असलेली लेव्ही साखर खुल्या बाजारात विक्री केली.
या प्रकरणी मा. उच्च न्यायालय छ.संभाजीनगर यांनी सदर रक्कम वसूल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेशित करून सदर रक्कम 12.40 टक्के व्याजदराने वसूल करण्याबाबत आदेश दिले.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सात डिसेंबर रोजी आदेश जारी करीत तहसीलदार तुळजापूर यांना प्राधिकृत करीत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 176 ते 183 व महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1967 मधील कलम 17 मधील तरतुदीनुसार अशोक हरिदास जगदाळे यांची नळदुर्ग (रूरल) गट नंबर 215/2 क्षेत्र 0.59.67 हे. आर चौरस मीटर व अलियाबाद शिवारातील गट नंबर 66 मधील क्षेत्र 5.21.00 हे. आर चौरस मीटर या मालमत्ते मधून रक्कम रूपये 4,98, 93, 450=00 वसूल करण्याबाबत आदेश दिले.
दरम्यान तुळजापूर तहसीलदार यांनी नळदुर्ग तलाठी यांना संबंधित आदेशाची प्रत देवून बोजा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी विश्वास वायचाळ यांनी सहा जानेवारी 24 रोजी नोटीस जारी करीत बोजा नोंद घेतली. त्यास मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी प्रमाणित करून घेतले.
प्रारंभी जिल्हा प्रशासनाने लेव्ही साखर प्रकरणी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी कारखान्याचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांना दोषी धरून त्यांच्यावर पोलीसात तक्रार दाखल केली होती, याप्रकरणी विकास भोसले यांनी प्रशासनाच्या विरोधात संबंधित प्राधिकरण व मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता त्यांना या प्रकरणी दोषमुक्त केले.
अशोक जगदाळे यांच्या मालमत्तेवर चढवलेला बोजाबाबत श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान याबाबत जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता बोजा चढवण्याच्या प्रक्रीयेस स्थगिती आणल्याचे सांगितले.