अणदूर, दि.२०: श्रीकांत अणदूरकर

धाराशिव जिल्हा काँग्रेस मधील दिग्गज नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव राज्य पणन महासंघाचे संचालक, तुळजाभवानी साखर कारखाना चेअरमन, कुलस्वामिनी सूत मिलचे चेअरमन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ,युवा नेते सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी धाराशिव येथे,आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये  प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील, धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील, लोकसभा क्षेत्रातील मान्यवर आमदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात फार मोठा धक्का बसला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश झाल्याने महाविकास आघाडीच्या धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवाराची मोठी पंचायत झाली आहे.तर महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड झाले आहे. अनेक दिवस सुनील चव्हाण याच्या भा. ज. पा. प्रवेशाची चर्चा होती. आगोदर दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला अन आता तुळजापूर तालुक्यातील वजनदार नेते सुनील चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे धाराशिव जिल्ह्यात अस्तित्व उरले नसून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून महायुती उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पारडे जड झाले आहे.

 सुनील चव्हाण यांचे सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात मोठे काम असून गावपातळीवर युवकांचा फार मोठा पाठिंबा त्यांना आहे. तुळजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती,सोसायट्या त्यांच्या ताब्यात असून तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व सुनील चव्हाण एकत्र आल्यामुळे तालुक्यात विरोधक उरलेच नाहीत, या प्रवेशामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची उत्तरे येणारा काळच देईल परंतु तूर्तास त्यांच्या भाजपात जाण्याने महायुतीच्या उमेदवाराचे बळ वाढले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांगीण विकास व राज्यातील विकासाभिमुख नेतृत्व, देवेंद्र फडणवीस यांच्या दमदार नेत्रत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण तुळजापूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी आपण भा ज पा मध्ये प्रवेश केला असून, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न तसेच भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी योगदान व या पुढील काळात जनतेच्या विकासासाठी बेरजेचे राजकारण करून विकासाचा अमृत कलश तालुक्यात आणणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी  बोलताना दिली.
 
Top