उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विजय कोणाचा याची उत्सुकता शिगेला  : विजयाचे गणित सोडविण्यात मतांची बेरीज व वजा बाकी सुरू


वागदरी,दि.१०: एस.के.गायकवाड

 लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात दि.७ मे २०२४ रोजी मतदान झाले.एकुन ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.हे जरी खरे असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यातच झाली असून कार्यकर्ते व पुढारी विजयाचे गणित सोडविण्याकरीता मतांची बेरीज व वजाबाकी करण्यात मग्न आहेत.


  विजयाची मशाल पेटणार की घड्याळ बाजी मारणार हे कोडे मतमोजणी नंतरच उलगडणार असले तरी मशाल आणि घड्याळ आपापल्या परीने विजयाचा दावा करीत आहेत.तसं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा मुळात राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता.पण काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढून गेल्या अनेक वर्षांपासून कालपर्यंत भाजपा व शिवसेना युतीच्या माध्यमातून शिवसेनेने या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
  
आतापर्यत शिवसेनेचे शिवाजी कांबळे, कल्पनाताई नरहीरे,प्रा.रविद्र गायकवाड, आणि ओमराजे निंबाळकर आदींनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.गेल्या दहा वर्षांपासून भाजपा शिवसेना युतीचे भाजप, शिवसेना ,रिपाइं (आठवले),रासप व मित्रपक्ष मिळुन महायुतीमध्ये रुपांतर झाले आहे.आजही या महायुतीच्याच ताब्यात हा मतदार संघ आहे.पण या आडीच वर्षात अनेक  अनपेक्षित नाट्यमय घडामोडी महाराष्ट्रच्या राजकारणात घडल्या आहेत.शिवसेनचे कार्याध्यक्ष तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतुन  एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांचा  गट घेऊन भाजपाच्या महायुतीत सामील झाला.पाटोपाट काका पासुन फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडून अजीत  पवार हेही राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा आपला मोठा गट घेऊन भाजपाच्या महायुतीत सहभागी झाले.तसेच मनसेचे राज ठाकरे यांनी महायुतीतला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्यामुबळे अर्थातच महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मित्र पक्ष मिळून उदयास आलेल्या महाविकास आघाडी समोर एक मोठं तगडे आव्हान उभे राहिले.जागा वाटपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघची जागा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा)चे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोडण्यात आली.तर अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा करत शेवटी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मशाल हे निवडणुक चिन्ह देण्यात आले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले.अर्थात या मतदारसंघात मशाल विरुद्ध घड्याळ अशी चुरशीची लढत होऊन दि.७ मे  रोजी या मतदारसंघातील भावी खासदारांचे नशीब मशिन मध्ये बंद झाले आहे.
  

आता ४ जून २०२४ पर्यंत तर्क वितर्क करत  विजय कोणाचा याची उत्सुकता वाढवली जाते आहे.
  विजय कोणाचा याची चर्चा करताना मतांची बेरीज व 
वजा बाकीचे गणीत घातले जात आहे.या मतदार संघातील महायुतीचे राजकीय बलाबल पाहीले असता या मतदार संघातील आठ विधानसभा आमदार पैकी महायुतीचे आमदार जास्त आहेत.तुळजापूर, उमरगा -लोहारा,भुम-परंडा, लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा आमदार हे महायुतीचे आहेत.तर उमरगा तालुक्यातील माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड व नुकतंच भाजपात प्रवेश केलेले माजीमंत्री बसवराज पाटील व तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र युवा नेते सुनील चव्हाण हे महायुतीच्या बाजुने आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवसैनिकाचे पाठबळ, शिवाय भाजपाची या मतदार संघात वाढलेली प्रचंड ताकद आणि अजित  पवार यांना मानणारा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गट, तुळजापूर न.प.चे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली वेगळं अस्तित्व निर्माण केलेले देवराज मित्र मंडळ आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेची निःपक्षपाती करत असलेली सेवा व गावागावात केलेली विकस कामे या सर्व बाबींची गोळाबेरीज केली असता महायुतीच्या सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.


  या उलट या लोकसभा मतदारसंघाचे विद्यामान खासदार उबाठा सेनेचे ओमराजे निंबाळकर यांची या मतदार संघातील जनतेवर चांगली पकड असून युवकांचा प्रचंड संपर्क त्यांचा आहे.युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ते ओळखले जातात शिवाय उबाठा सेनेचे उस्मानाबाद विधानसभा आमदार कैलास पाटील यांची खंभी साथ, शिवसेनेचे सर्वासर्वे कार्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार या मतदार संघात आहे.नेते त्यांच्या सोयीनुसार भाजपात गेले असले तरी आम्ही त्यांच्या सोबत मेंढरा सारखे त्यांच्या पाठीमागे जाणार नाही असं म्हणणारे कट्टर शिवसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनुक्रमे उध्दव ठाकरे व शरद पवारांच्या पाठीमागे निष्ठा ठेवून उभे आहेत त्यामुळे त्यांचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार उबाठा सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना होणार आहे.या मतदारसंघात प्रचारादरम्यान प्रचार मोदीचा तर जयजयकार ओम दादाचा अर्थात ओमराजे निंबाळकरांचा असे चित्र दिसत होते.त्यात वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते कोणाच्या पथ्यावर पडणार हाही एक प्रश्न आहे.त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या मशालीला मिळालेली मते सौ.अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळला मिळालेल्या मतातून वजा केली असता ओमराजे निंबाळकर यांचाच विजय मतदारांना खुणावत आहे.असे असले तरी दि.४ जून  रोजी होणाऱ्या मतमोजणी नंतरच उलगडणार आहे. या  निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे निबांळकर यांची विजयाची मशाल पेटणार की सौ.अर्चनाताई पाटील यांचे घड्याळ बाजी मारणार?

 
Top