एसबीआय फाउंडेशन’चे २० सिमेंट बंधार्‍याचे काम
- ‘एसबीआय फाउंडेशन’ने  औसा आणि तुळजापूर तालुक्यातील २० गावांमध्ये बांधले २० सिमेंट बंधारे, भर उन्हाळ्यात दिसू लागले पाणी, १८०० शेतकर्‍यांना फायदा

धाराशिव, दि. ०५

‘एसबीआय फाउंडेशन’ने औसा आणि तुळजापूर तालुक्यातील २० गावांमध्ये सिमेंट बंधार्‍याचे काम इतके मजबूत केले आहे की भर उन्हाळ्यातही लोकांना पाणी पहायला मिळत आहे. या कामामुळे तब्बल १८०० शेतकर्‍यांना फायदा होत असून अप्रत्यक्षपणे दहा हजार ग्रामस्थांना त्याचे फळ मिळू शकते.

मुंबईतील ‘एसबीआय फाउंडेशन’ने कामाचा चांगला ठसा उमटविला आहे. सिमेंट बंधार्‍यांमुळे बहुतांश गावांमध्ये यंदा भर उन्हाळ्यातही पाणी दिसत आहे. एरवी सगळीकडे पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष्य दिसते पण या कामामुळे बंधार्‍यांच्या नजीक असलेल्या विंधन विहिरीत मात्र पाणी टिकून आहे. त्यामुळेच गावकर्‍यांच्या चेहेर्‍यांवर समाधान दिसत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर बंधार्‍यांची देखभाल, पाण्याचा योग्य वापर, त्या अनुषंगाने पीकांची निवड यावरही शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळेच गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस पडूनही यंदा भर रणरणत्या उन्हाळ्यातही बंधार्‍यानजीकच्या विंधन विहिरीला पाणी टिकून आहे.

 त्यामुळेच हे काम खरोखरच दखलपात्र झाले आहे. 
एसबीआय फाउंडेशनच्या ‘ग्राम सक्षम’ प्रकल्पांतर्गत या कामासाठी पुढाकार घेण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एसबीआय आणि दिलासाने केलेल्या या कामामुळे या बंधार्‍यांच्या कार्यक्षेत्रातील शेतजमिनींना फायदा झाला. या बहुतांश गावांमधील शेतकर्‍यांना या उपलब्ध पाण्याचा कसा फायदा घ्यायचा, पीक पद्धतीत कसे फायदेशीर बदल करायचे, बंधार्‍यांची देखभाल कशी करायची आणि त्यातून कायमस्वरूपी पाणीबचत कशी करायची याचेही प्रशिक्षण देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यासाठी काही निवडक अभ्यास सहलींचेही आयोजन करण्यात आले होते. 

 - गावकर्‍यांचाही सहभाग

या जलसंधारणाच्या कामामुळे वीस गावांमध्ये बर्‍यापैकी फायदा झाला आणि भविष्यातही ही कामे खूप उपयुक्त ठरणार असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कामासाठी त्या त्या गावांमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी आणि युवकांनीही पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळेच ही कामे लवकर व योग्य पद्धतीने होण्यात मदत झाली. 


या गावांमध्ये झाले काम : तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, इंदिरानगर, वागदरी, सोमलिंगनगर तांडा, येडोळा, रामनगर, हंगरगा, नल, लालवाडी, गायरान तांडा, जकनी तांडा, खुदावाडी या दहा गावांमध्ये तर औसा तालुक्यातील बनेगाव, तापसे चिंचोली, गाडवेवाडी, गोटेवाडी, तळणी तांडा, उत्का, दावतपूर आणि गंजनखेडा या वीस गावांमध्ये हे सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत.
 
Top