साखर कारखान्यानी ऊसाची बीले रोखल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

नळदुर्ग ,दि.१०

साखर कारखानदारांनी ऊसाची बिले रोखल्याने तुळजापुर तालुक्यातिल ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर  संकट आले असताना तालुक्याचे लोकप्रतिनीधी मुग गिळून गप्प का बसले? याबाबत शेतकऱ्यांतुन विचारणा केली जात आहे.

  तुळजापुर तालुक्यातिल ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांपुढे  साखर कारखान्यानी  गेल्या वर्षी साखर कारखान्यास घातलेल्या ऊसाचे बिल अद्याप न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आसुन कांही शेतकरी तर कारखान्यावरच आत्महत्या करन्यासारखा  प्रयत्न करताना दिसत आहेत.          

तुळजापुर तालुक्यात गेल्यावर्षी मुबलक ऊस उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस *नळदुर्ग  येथिल तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वानी चालवन्यास  घेतलेल्या गोकुळ शुगर, लोहारा तालुक्यातील खेडचा लोकमंगल व मुरुम येथिल साखर कारखान्यास घातला आहे.                      

या कारखानदारांनी अनेक शेतकऱ्यांचे आठ महिन्यापासुन ऊसाचे बिलेच दिली नसल्याचे समजते.  तसेच कामगारांच्या थकित पगारी सुध्दा दिल्या गेल्या नाहीत. यामुळे अनेक कामगारांनी न्यायालयात ही धाव घेतली असतानाच आता शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुळजाभवानीने गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे बिल गोकुळ शुगरने दिले नसल्यामुळे गेल्या आठवड्यापासुन  शेतकरी संघटनेने आंदोलन तिव्र केले आहे. तुळजापुर तहसिल समोर उध्दव बाळासाहेब ठाकरे सेने कडून अमोल जाधव व शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण ही  केले आहे.

दुसरीकडे खेडच्या लोकमंगल व मुरुम च्या साखर कारखान्यानी ही अद्याप ऊसाची बिले दिलेली नाहीत. या विरुध्दही शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहे. तर दुसरीकडे  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर  अद्याप लोकप्रतिनिधी गप्प कसे. सोईच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आसुन या बाबत विधानसभेत  आवाज उठवायला पाहीजे होता. असा सवाल शेतकरी व्यक्त करीत आहेत.

श्री तुळजाभवानी साखर कारखाना गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने भाडेतत्वावर घेतले असून दुसऱ्या गाळप हंगामात चार हजार 200 शेतकऱ्यांचा एक लाख 23 हजार 828 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आज पर्यंत एफ आर पी च्या 78 टक्के  म्हणजेच 28 कोटी 42 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. उर्वरित सहा कोटी पंधरा दिवसात जमा होतील अशी माहिती तुळजाभवानी युनिटचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी दिली.
 
Top