सरकारची धोरणे माध्यम व्यवस्था कमजोर करणारे : पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल
वागदरी, दि. १६ एस.के.गायकवाड
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून एक महत्त्वाचा घटक आहे.सरकारची धोरणे, योजना व समाजातील जिव्हाळ्याच्या समस्या समाजात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना,समाजाच्या व्यथा आणि वेदना तळमळीने जनतेसमोर मांडणारा सरकार आणि जनता दरबार यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे पत्रकार होय. परंतु पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले, खंडणीचे गुन्हे, छपाई कागदाचे व छपाईचे वाढलेले दर त्यांना मिळणारे मानधन ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांच्या मागण्याकडे सरकारचे दुर्लक्ष या सर्व बाबींचा विचार केला असता सरकारचे धोरण हे माध्यम व्यवस्था कमजोर करणारेच दिसते. त्यामुळेच पत्रकारांच्या बळकटीसाठी आणि लोकशाही टिकविण्यासाठी पत्रकार संवाद यात्रेचा प्रपंच मांडल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी तुळजापूर येथे बोलताना सांगितले .
राज्यातील सर्व पत्रकारांच्या विविध जिव्हाळ्याच्या आणि न्याय हक्कासाच्या मागण्या घेऊन वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दि.२८जुलै पासुन दिक्षा भूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई असे पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आलेली असून या यात्रेचे दि.१४ आॅगस्ट २०२४ रोजी तुळजापूर येथे आगमन झाले असता वसंत मुंडे हे पत्रकारांशी बोलत होते.
या पत्रकार संवाद यात्रेचे तुळजापूर नगरीत आगमन होताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले.प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शासकीय विश्रामगृहात उपस्थित पत्रकारांना संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी परिवर्तन सामाजिक संस्था सचिव मारुती बनसोडे यांचेही शुभेच्छापर भाषण झाले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा, कवड्याची माळ,फेटा, भैरवनाथ कानडे लिखित थोरांची ओळख हे पुस्तक व बुके देवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तुळजापूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर सामाजिक कार्यकर्ते ऋषी मगर,रिपाइं (आठवले)चे तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम यांनी पुष्पहार देऊन यात्रेचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी तर सुत्रसंचलन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष एस.के.गायकवाड यांनी केले . आभार पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे, मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हा अध्यक्ष धनंजय पाटील, संजय फुलसुंदर, निलेश यलगीरे, संघाचे मंत्रालयिन प्रतिनिधी अहमद शेख,सामाजिक कार्यकर्ते धर्मराज झेंडे, राम जाधव जयराज क्षिरसागर, शामकांत नागीले, इरफान काझी, संजय पीसे, अजिंक्य मस्के,मंगेश सुरवसे आदीसह पत्रकार उपस्थित होते.