गोहत्या करणा-यावर कठोर कारवाईसाठी
हिंदू संघटनेच्यावतीने नळदुर्ग पोलिस ठाण्यावर मोर्चा
नळदुर्ग, दि.११
नळदुर्ग येथे गोहत्या करणाऱ्या व गोहत्या करतानाचा व्हिडीओ बनवून प्रसारीत करणाऱ्यावर कठोर कारवाई करून गोहत्या बंदी कायदा कठोरपणे आमलात आणावा या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील समस्त हिंदू संघटणांनी मोर्चा काढुन पोलिसांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हणले आहे की, महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असताना आपल्या नळदुर्ग नगरात पवित्र श्रावण महिन्यात गोहत्या करत व्हिडीओ प्रसारीत करत समस्त हिंदू बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत. सदर घटना अत्यंत संतापजनक व खेदजनक आहे.
नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी गोहत्या होत असल्याच्या तक्रारीनंतरही याविरोधात उचीत कारवाई होत नसल्याने कायदा व सुव्यवस्था याबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. तरी नळदुर्ग शहरात तपास करून गोहत्या तात्काळ थांबवावी. गोहत्या करणारा व व्हिडीओ प्रसारीत करणा-या विरोधात गोहत्या बंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी तसेच गोहत्या बंदी कायद्याची कठोर आमलबजावणी व्हावी. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. अशा आशयाचे निवेदन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गजेंद्र सरोदे यांना देण्यात आले.
तत्पूर्वी मोर्चाची सुरवात आंबाबाई मंदिर येथून करण्यात येवून माऊली नगर, बसस्थानक, शास्त्री चौक मुख्य बाजारपेठ मार्गे पोलीस ठाण्यापर्यत मोर्चा काढण्यात आला. भगवा ध्वज घेतलेल्या तरूणांनी नेतृत्व केले.तसेच असंख्य तरूणांनी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेल्या होता. यावेळी गोरक्षणार्थ घोषणा देण्यात आल्या. धाराशिव, तुळजापूर शहरासह अणदूर, जळकोट, नळदुर्ग येथील विविध हिंदू संघटनेतील तरुण मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी होते. नळदुर्ग पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.