बुजुर्ग माजी मंत्री मधुकरराव चव्हाण येणाऱ्या विधानसभा निवडणुक रणधुमाळीसाठी नवव्यांदा जोरदार तयारीत, इच्छुक झाले स्तब्ध
नव्वदीतला तरूण मल्ल नव्व्यांदा धोतराचा काष्टा मारून निवडणूकीच्या फडात!
तुळजापूर,दि.२६: शिवाजी नाईक
काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी ९० व्या वर्षी पुन्हा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे, त्यांच्या गाव बैठका सुरू असून पक्ष कार्यकर्ता तसेच मतदार यांना भेटीगाठी सुद्धा सुरू केले आहेत. वय वर्ष ९० असताना देखील त्यांना पुन्हा आमदार होण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांसह मतदारांना भेटत आहे.
मधुकरराव चव्हाण हे महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रीय काँग्रेसकडून २०१४ वर्षी निवडणुकीत निवडून आले होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते १९८५ पासून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. १९८५ मध्ये उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र १९९० मध्ये तुळजापूर मतदारसंघात ते विजयी झाले. पुन्हा १९९५ मध्ये ते शेकापचे माणिकराव खपले यांच्याकडून पराभूत झाले. १९९९ पासून ते सलग चार वेळा (१९९९, २००४, २००९, २०१४) तुळजापूर मतदारसंघातून विजयी झाले.
सध्याच्या बदलत्या राजकीय समिकरणातही त्यांची वोट बँक त्यांच्या पाठीमागे कायम असुन वयाच्या ९० व्या वर्षीही मधुकरराव चव्हाण राजकीय वर्तुळात तरुणांना लाजवेल अशी धडपड करताना दिसुन येत आहे. ते तुळजापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक असुन सलग ४ वेळा आमदार राहिलेले चव्हाण राज्यातले सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांची लढत भाजपच्या राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत लढत होवुन केवळ १७ हजार मतांनी त्यांना पराभव पत्करला. येणाऱ्या निवडणुकीसाठी चव्हाण हे नवव्यांदा विधानसभा निवडणुक लढविण्यास जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
दुग्धविकास मंत्री, उपसभापतिपद ज्येष्ठ उमेदवार मधुकर चव्हाण १९९९ पासून २०१९ पर्यंत सलग चारवेळा तुळजापुरातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९९० ते १९९५ या दरम्यानही ते आमदार होते. १९९५ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माणिकराव खपले यांच्याकडून चव्हाणांचा पराभव झाला होता. उस्मानाबादमधूनही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले होते. आता नवव्यांदा ते मैदानात उतरले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पंचायत समिती सदस्यापासून झाली. लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दुग्धविकास व पशूसंवर्धनमंत्री, विधानसभेचे उपसभापती, अशी अनेक पदे भूषविली आहेत.