शिक्षणाच्या धंद्यात आदर्श शिक्षक हरपला
(राष्ट्रीय शिक्षक दिन विशेष ०५ सप्टेंबर २०२४)
लेखक- डॉ. प्रितम भि. गेडाम
शिक्षण हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे आपण जगातील कोणतेही सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकतो आणि केवळ आदर्श शिक्षकच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, संस्कार आणि कलात्मक गुण देऊ शकतात. जीवनात शिक्षकाचे स्थान पालकांच्या बरोबरीचे असते, कारण शिक्षक हेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून जीवनात यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास सक्षम करतात. गुरूशिवाय जीवनात ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. शिक्षक ही गुणांची खाण आहेत, शिक्षक हे ज्ञानी, तज्ञ, मृदुभाषी, दूरदृष्टी असलेले, सहिष्णू, चांगले श्रोते-वक्ते, हुशार, प्रोत्साहन देणारे, संशोधक, जिज्ञासू, परोपकारी, सत्यनिष्ठ, त्याग करणारे, सदाचारी, धैर्यवान आणि निर्व्यसनी असतात. शिक्षक त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना समान पातळीवर पाहतात आणि कधीही भेदभाव करत नाहीत. शिक्षक हे शिल्पकारांच्या भूमिकेत असतात जे आपल्या विद्यार्थ्यांचे कलात्मक कौशल्य वाढवून त्यांना आदर्श विद्यार्थ्यांमध्ये बदलतात. आपल्या देशात समाजसुधारक म्हणून महान शिक्षक लाभले आहेत.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, ज्यांनी भारतातील स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी समाजाचा द्वेष सहन करून मुलींसाठी पहिली शाळा काढली. ज्योतीबांनी आपल्या पत्नीला शिकवून एक आदर्श शिक्षिका बनवून इतिहास रचला आणि त्यानंतर दोघांनी मिळून शिक्षणाचे मूल्य समाजात रुजविण्यासाठी नवीन क्रांती सुरू केली. लोकांचे टोमणे, शिव्या, अपमान सहन करायचे. लोक त्यांच्यावर दगड, माती आणि शेण फेकत असत. संपूर्ण समाज त्यांच्या विरोधात असतानाही थोर समाजसुधारक फुले दाम्पत्याने निस्वार्थपणे सर्वस्वाचा त्याग करून शिक्षणाची ज्योत पेटवत ठेवली. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची क्षणभर कल्पना केली तरी आपला जीव हादरतो, सुशिक्षित समाजाचा पाया रचण्यासाठी त्यांनी अश्या असह्य आणि वेदनादायी संघर्ष सहन केले.
हळूहळू अनेक थोर समाजसुधारकांनी शिक्षण जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी संस्था स्थापन केल्या. कोणताही भेदभाव, लिंगभेद, जातीवाद न करता सर्वांना समान शिक्षणाचा अधिकार मिळावा, हाच या शैक्षणिक संस्थांचा उद्देश होता. आजच्या आधुनिक युगातील शिक्षणाचा स्तर पाहिला तर त्याचे स्वरूप गेल्या काही दशकांच्या तुलनेत पूर्णपणे विरुद्ध झालेले दिसते. मुलांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे नर्सरीपासून ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण पॅकेजच्या स्वरूपात पैश्यानुरूप दिले जाते, यामध्ये पुस्तके, गणवेश, कोचिंग, स्टेशनरी, प्रोजेक्ट सर्वकाही आगाऊ ठरवले जाते. शिक्षणाच्या बाजारात खूप स्पर्धा आहे. काही महागड्या शैक्षणिक संस्था तर विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेलप्रमाणे अत्याधुनिक सेवा-सुविधा देखील पुरवितात. शिक्षण क्षेत्रात आता देखाव्याला सर्वात जास्त महत्व दिले जाते.
आपल्या देशात सरकारी आणि खाजगी अशा दोन प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहेत. सरकारी संस्थांमधील शिक्षकांचे पगार चांगले असल्याने तेथील शिक्षकांची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. आयआयटी, आयआयएम, विद्यापीठ, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, आर्मी पब्लिक स्कूल यासारख्या केंद्र सरकारच्या संस्था देशात त्यांच्या चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी ओळखल्या जातात. परंतु इतर संस्थांमध्ये शिक्षण व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याचे दिसून येते. अनेक प्रवेश परीक्षा आणि शिक्षक भरतीमध्ये फसवणूक दिसून येते. अनेक बड्या पगारदार शिक्षकांना त्यांच्या विषयाचे ज्ञान नसते. अनेक राज्यातील सरकारी शैक्षणिक संस्था रद्दीच्या दुकानासारख्या दिसतात, विशेषतः मागासलेल्या भागात. बनावट पदवीसाठीही रॅकेट सक्रिय असल्याचे समजते. हरियाणाच्या एक लेखक मित्राने मला सांगितले की त्यांचा एक लेख देशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठाच्या कुलगुरू ने वाङ्मय चोरी करत स्वतःच्या नावाने एका प्रसिद्ध मासिकेत लेख प्रकाशित केला. शिक्षण विभागातील अनेक गंभीर समस्या आपल्याला माहीत आहेत, मात्र कोणीही उघडपणे विरोध करत नाही. आज शिक्षकही व्यभिचार, भ्रष्टाचार, भेदभाव आणि अमली पदार्थांच्या सेवनात गुंतलेले दिसतात.
आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या प्रसिद्ध खासगी शैक्षणिक संस्था शिक्षणाचा दर्जा टिकवून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र छोट्या खासगी संस्थांमध्ये नियमानुसार पात्र शिक्षकांची भरती केवळ नावावरच केली जाते, कारण अत्यंत कमी पगारावर शिक्षक नियुक्त करणे हा त्या शिक्षकाचा विश्वासघात आहे. त्यामुळे अशा संस्थांमध्ये दरवर्षी अपात्र नवीन शिक्षक येतात आणि जातात. या काळात विद्यार्थ्यांचे खूप हाल होतात आणि शिक्षकही त्यांच्या तुटपुंज्या पगारानुसार तात्पुरते शिक्षण देतात. असे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही विकसित समाजासाठी अडथळे म्हणून काम करतात. आजकाल देशातील शिक्षणाच्या घसरत्या पातळीला अशी शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे.
शिक्षण क्षेत्रात रोज अनेक कलंकित घटना घडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ९२ प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी ३० कोटी रुपयांची लाच घेतल्याची बातमी १५ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूरच्या दैनिक भास्कर हिंदी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. ह्यानुसार प्रत्येक पदासाठी ५०-८० लाख रुपये घेण्यात आल्याचे कळले. तसेच २० ऑगस्ट २०२४ रोजी लोकमत मराठी वृत्तपत्रात, छत्रपती संभाजी नगर येथील एका महाविद्यालयाची प्राध्यापिका ज्यांचे वेतन पावणे तीन लाख रुपयांच्या जवळपास आहे, त्यांनी त्यांच्या एका पीएचडी विद्यार्थ्याकडून एकूण 5 लाख रुपये लाच घेण्याचे ठरवले आणि पहिल्या हप्त्याचे ५० हजार रुपये लाच घेताना प्राध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची बातमी प्रसिद्ध झाली. अशा बातम्या अनेकदा वाचायला-ऐकायला मिळतात, या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे वास्तव चांगलेच माहीत आहे, पण त्याच्या भीषणतेचे बळी फक्त गरीब आणि पात्र उच्चशिक्षित उमेदवारच होतात, कारण ते लाच देऊ शकत नसल्याने त्यांना नोकरी मिळवणे अवघड जाते. या समस्येची अनेकवेळा कुलगुरू, सत्ताधारी नेते, मंत्र्यांना कळवूनही कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही. ज्यांनी चुकीच्या मार्गाने शिक्षक हे पवित्र पद प्राप्त केले आहे ते खरोखरच आपल्या पदाची प्रतिष्ठा, न्याय आणि सचोटी राखून आदर्श शिक्षक बनू शकतील का? आपल्या देशात यूजीसी-नेट, सेट इत्यादी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून, एमफिल, पीएचडी पदवी मिळवूनही हे उच्च शिक्षण घेण्यासाठी आयुष्याची अनेक वर्षे, पैसा आणि वेळ खर्ची घालूनही त्यांना २० वर्षांहून अधिक काळ होऊन सुद्धा त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळाली नाही, त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये कंत्राटी किंवा तासिका तत्वावर शिक्षकांना रोजंदारी मजुरांपेक्षा कमी पगार मिळतो. या महागाईत जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे, त्यामुळे अनेकवेळा असे शिक्षक नैराश्याने आत्महत्याही करतात. अशा परिस्थितीला जबाबदार कोण आहे?
एकदा मी चंद्रपूर जिल्ह्याचा ग्रामीण भागात राज्य शासनाच्या अनुदानित मुलांच्या निवासी आश्रमशाळेत एक दिवस थांबलो. त्यावेळी पावसाळा होता, आश्रमाची इमारत भग्नावस्थेत होती, लाकडाचे तुकडे जोडून तात्पुरता दरवाजा बनविला होता, खोलीच्या आतून भिंती ओल्या होत्या, अशा अपुऱ्या सुविधांमध्ये लहान विद्यार्थी तिथे खाली दरी टाकून झोपायचे. स्नानगृहे व स्वच्छतागृहे अतिशय अस्वच्छ असल्याने तेथील विद्यार्थी आश्रमातील विहिरीजवळ उघड्यावर आंघोळ करीत असत. तिथले स्वयंपाकघर बघून कोणाचीही हिंमत होत नसे जेवण्याची. भिंतीला लागूनच नाली वाहत होती, ज्यामध्ये मोठे डास क्षणभरही आपल्याला शांत बसू देत नसत, अशा वातावरणात साप, विंचू यांची सुद्धा भीती असायची. आजही ते दृश्य आठवले की अंगाला काटा येतो आणि तिथल्या विद्यार्थी मुलांची कीव सुद्धा येते की, देशाचे भविष्य कोणत्या दयनीय अवस्थेत दिवस काढत आहे. आजच्या युगात खरा शिक्षक होणे खूप अवघड आहे.
डॉ. प्रितम भि. गेडाम
prit00786@gmail.com