भावी आमदाराने खड्ड्यातील पाण्यात मारली फतकल, अनोखे आंदोलन पाहून नागरिक भारावले.
नळदुर्ग, दि.२६ : शिवाजी नाईक
देश स्वतंत्र होऊन सुद्धा ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस (प्रवासी ) अजुनही खड्ड्यातच जगत असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने संतप्त झालेले तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी बसस्थानक आवारात खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बैठक मारली.हे अनोखे आंदोलन पाहून नागरिकही भारावले.
सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे दुर्लक्ष झालेल्या सोलापूर हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग येथील राज्य परिवहन महामंडळ एसटी बसस्थानक व परिसराच्या दुरवस्थाने कळस गाठले आहे. बसस्थानकाच्या आवारातुन प्रवाशांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते.
सततच्या पावसाने नळदुर्ग येथील बस स्थानकात पडलेल्या असंख्य खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबके तयार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांचे होणार हाल पाहून अण्णासाहेब दराडे यांनी बुधवारी सायंकाळी नळदुर्ग बस स्थानकातील एका डबक्यात चक्क बैठक मारून प्रशासनाचा निषेध केला. यावेळी नळदुर्ग बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवासी होते व बघ्यांचीही गर्दी झाली होती. अण्णासाहेब दराडे यांनी खड्ड्यातील पाण्यात मांडी घालून बसत प्रशासनावर टीकेचे आसूड ओढले. शासनाच्या विविध विभागातील भ्रष्टाचार, ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा बद्दल ही त्यांनी शासनावर टीका करत सगळ्यांचे लक्ष वेधले.
अण्णासाहेब दराडे हे तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी तुळजापूर तालुक्यातील 65 गावांमधून मोठ्या प्रमाणात गाठीभेटी घेत प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे, ग्रामीण भागात त्यांना नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण कुणीही गॉडफादर नसलेला सामान्य कुटुंबातील तरुण छोट्या छोट्या वाड्यावर, तांड्यावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी व विजेचा प्रश्न गंभीर असल्याचे जाणवत असल्याचे अण्णासाहेब दराडे यांनी सांगितले.