विस्कटलेल्या समाजाला सुव्यवस्थित करण्यासाठी सामाजिक समुपदेशन करणे गरजेचे- प्रा. डॉ. महेश मोटे
माकणी, ता. लोहारा, ता. २०:
सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यासातून सामाजिक व्यवस्था, इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थव्यवस्था यांचे सखोल ज्ञान मिळते. ज्यामुळे विविध क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. समुपदेशनाचे उद्दिष्टे व्यक्तींना त्यांचे व्यक्तिगत, मानसिक, सामाजिक व भावनिक समस्या सोडविण्यासाठी मदत करणे. समुपदेशन एक व्यावसायिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे समुपदेशक आणि व्यक्ती यांच्यात संवादाच्या माध्यमातून विचारमंथन होते. सध्याच्या काळात विस्कटलेल्या समाजाला सुव्यवस्थित करण्यासाठी सामाजिक समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
माकणी, ता. लोहारा येथील भारत शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्र मंडळ व सामाजिक समुपदेशन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (ता. २०) रोजी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे, पत्रकार योगेश पांचाळ उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मोटे म्हणाले की, माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवण्याचे काम सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून होते. समाजातील विविध प्रश्नांना समजून घेण्याचा व त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक शास्त्रे व सामाजिक समुपदेशन यांचे जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे मत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण मुंडे यांनी प्रास्तविक केले. प्रा. डॉ. जयपाल सूर्यवंशी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सामाजिक शास्त्र मंडळाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल गाडेकर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. दिलीप बिराजदार यांनी आभार व्यक्त केले. सामाजिक शास्त्र मंडळाचे सदस्य डॉ. कल्याण कदम, प्रा. रूपचंद खराडे, प्रा. डॉ. अतुल बिराजदार, प्रा. चंद्रकांत जाधव आदींनी पुढाकार घेतला.
फोटो ओळ : माकणी, ता. लोहारा येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उद्घाटक प्रसंगी प्रा. डॉ. महेश मोटे बोलताना प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, डॉ. श्रीकृष्ण मुंडे व अन्य.