पवनचक्कीच्या पात्यात शेतक-याच्या स्वप्नांची राख रांगोळी ,प्रशासनाकडून दुर्लक्ष ?
पवनचक्की कंपनीने शेतीचे नुकसान करुन बेकायदेशीर रस्ते केले तयार
नळदुर्ग,दि.२६ : शिवाजी नाईक
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) महसुल मंडळा अंतर्गत गावाच्या शिवारात पवन ऊर्जा कंपनीने शेतीचे नुकसान करुन बेकायदेशीर रस्ते तयार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
पवनचक्की बसविण्यासाठी यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं उध्वस्त करून शेतकऱ्यांच्या जमिनीचीही वाट लावली आहे. तर कांही ठिकाणी अवजड वाहनांमुळे शेतातील जमिनी खाली असलेल्या पाईपलाईनची पुरती वाट लागली आहे. तब्बल दिडशे पेक्षा जास्त पाईप फुटून मानेवाडी शिवारात शेतक-याचे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील चिवरी- हगलुर शिवारात पवन ऊर्जा क्षेत्रातील एका कंपनीने ऐन सुगीच्या हंगामात धुमाकूळ घातला आहे.
तुळजापूर तालुक्यातील बसवंवाडी,बोरनदवाडी, चिवरी,हगलुर,मानेवाडी,गंधोरा, सलगरा, मुर्टा, चिकुंद्रा, अणदुर या गावाच्या शिवारात अंदाजे ५० पेक्षा अधिक पवनचक्की बसविण्याची माहिती समोर आली आहे.
यापैकी मानेवाडी शिवारात शेतात बसविलेल्या पवनचक्की शेजारी असलेल्या अल्पभुधारक शेतकरी मोतीराम पवार, देविदास अंबादास राठोड,गणपत अंबादास राठोड, भानुदास राठोड यांच्या शेतातील उभ्या पिकांवर सावली पडून सोयाबीन व उडीद उत्पादनात मोठी घट झाल्याचे मिथुन गणपत राठोड यांनी माहिती सांगितले.
पवन चक्क्यांची उभारणी करणाऱ्या कंपनीने स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून तालुक्यात बस्तान मांडले आहे. सुरवातीला शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी स्थळ निश्चिती करून कंपनीने संबंधित शेतमालकासोबत 30 वर्षांचे करार केले. असे करताना कंपनीने संबंधित ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्रही घेतले नसल्याचे समजते.
पवनचक्कीच्या उभारणीसाठी मोठ मोठी यंत्रसामग्री अवजड वाहनातुन वाहून न्यावी लागते. त्यासाठी विस्तीर्ण रस्त्यांची आवश्यकता असते. कंपनीने स्थानिक पातळीवरील कांहीं लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे रस्ते तयार करायला सुरुवात केली आहे. तालुक्यातील संबंधित प्रशासनास मॅनेज करून कंपनीने स्वतःची यंत्रणा उभी केली असल्याची चर्चेअंती समजते. या यंत्रणेने कंपनीला रस्ते तयार करून देण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची उभी पिकं उध्वस्त करायला सुरुवात केली आहे. पोकलेन आणि जेसीबी सारख्या मोठमोठ्या यंत्रणेने शेत खोदून निघालेली माती, मुरूम आणि झाडे निर्दयीपणे पुन्हा त्याच शेतात लोटून उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान केले जात आहे. विशेष म्हणजे कुठलीही शासकीय यंत्रणा सोबत नसताना, कुठलाही प्रशासकीय अथवा शासकीय आदेश नसताना खासगी यंत्रणेद्वारे हा धुमाकूळ घातला जात बोलले जात आहे.
स्वतःच्या मालकीची जमीन उघड्या डोळ्याने उध्वस्त होताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नाही. याबाबत पीडित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात तक्रार करणे गरजेचे आहे.दरम्यान रेनिव कंपनीचे उत्तम कुमार प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता याविषयी माहिती देण्याचे टाळुन दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
दरम्यान तुळजापूर तहसिलदार अरविंद बोळंगे, नायब तहसिलदार संतोष पाटील यांच्याशी मोबाईल फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलले नाही. सालगरा (दिवटी) मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार, चिकुंद्रा सज्जाचे तलाठी जयराज कुलकर्णी यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता पवन ऊर्जा कंपनीने किंवा संबंधित यंत्रणेने कसलेही अर्ज देऊन परवानगी घेतली नाही. संबंधित शेतकऱ्यानी तहसिल कार्यालयात तक्रार देण्याचे सांगितले.