दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती
पिंपळ्यातील छोट्यांचे मोठे काम - पारंपारिकता जपत सामाजिक योगदान
तुळजापूर,दि.२६ :
सध्या महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तर समाज जीवनात दिवाळीच्या उत्सवाची संपूर्ण तयारी ही सुरू असल्याचे आपणास पहावयास मिळते . पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर येथे या दोन्ही बाबींचा सुंदर मिलाफ साधणारा दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून मतदान जनजागृती करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक श्री विठ्ठल नरवडे यांच्या कल्पनेतून मुलांना आनंद देणाऱ्या व कल्पकत्तेला उधाण आणणारा हा उपक्रम राबवण्यात आला . या उपक्रमाचे केंद्रप्रमुख साधना चव्हाण व मुख्याध्यापक देविदास गायकवाड यांनी कौतुक केले आहे .
नवनिर्मिती ही मुलांना आनंद तर देतेच शिवाय आत्मविश्वास ही प्रदान करते . कल्पनाशक्तीला मूर्त रूप अशाच उपक्रमातून येते . सांस्कृतीक वारसा व परंपरा जपत सामाजिक ऐक्याचे ऋणानुबंध शुभेच्छाच्या माध्यमातून दृढ होतात . नात्यातील व्यक्तींना दिवाळीच्या गोड शुभेच्छा देत मुलांनी थोरांना मतदान करण्याचे आवाहनही केले . "मतदान तुमचे - भविष्य आमचे " अन् "तुमच्या हाताने माझे भाग्य घडवा" अशी भावनिक साथ मुलांनी या पत्रातून घातली आहे . लोकशाहीच्या बळकटीसाठी निवडणूक आयोगाकडून मतदान जनजागृती केली जाते . यात पिंपळा खुर्द येथील मुलांनी शुभेच्छा पत्रातून मतदानाचे महत्त्व व मतदान जनजागृतीचा संदेश पाठवला आहे .
दिवाळीचा उत्सव फटाके ,फराळ व आकाश दिव्याने संपन्न होतो तर सशक्त व सक्षम लोकशाहीचा उत्सव हा प्रत्यक्ष मतदानाने साजरा करावा असे आवाहन मुलांनी केले .सण हे केवळ उत्सव साजरे करण्यापुरते मर्यादित नसतात , त्यांचा वापर समाजात सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी करता येतो . या गोष्टीची प्रचिती अशा उपक्रमातून येते .एक वेगळा दृष्टिकोन जपत पारंपारिक सण व मतदान जागृती याचा अनोखा समन्वय यातून साधला गेला आहे .चिमुकल्या हाताने योग्य रंग संगती साधक पणती , आकाशकंदील चित्ररूपाने साकारून गोड शुभेच्छा तर दिल्याच अन् दिवाळीच्या उत्सवानंतर लोकशाहीचा उत्सव पवित्र मतदारांनी करून हा ही सण गोड करा .*सर्वांना माझी विनंती मत द्या आणि दाखवा शक्ती* असे म्हणत जागरूक मतदार बना असाच संदेश चिमुकल्यांनी दिला आहे . या प्रसंगी देविदास गायकवाड ,दयानंद जेटीथोर , विठ्ठल नरवडे , पांडुरंग जावळे , प्रशांत वैदकर , मनोज पाटील , गुणवंत चव्हाण , अगरचंद शिंदे , ज्ञानेश्वर रोमन यांची उपस्थिती होती .
श्री . विठ्ठल नरवडे सहशिक्षक - पिंपळा खुर्द,ता.तुळजापूर
अशा उपक्रमातून मुलांची सर्जनशीलता आणि कल्पकता वाढीस लागते .विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा पत्रातून शुभेच्छा संदेश देण्याबरोबरच मतदान करा अशी विनंती केली आहे . शिवाय मतदानाचे महत्त्वही सांगून मतदान जागृती मध्ये खारीचा वाटा त्यांनी उचलला आहे .निश्चितच पोस्ट कार्डद्वारे दिवाळीत शुभेच्छा व मतदानाची विनंती असा समन्वय यातून साधला आहे . निश्चितच विद्यार्थ्यांचे हे आवाहन पालकांमध्ये मतदानाबद्दलची जागृता वाढवण्यास निश्चित फायदेशीर ठरेल असा विश्वास वाटतो .