बहुचर्चित व सर्वांचे लक्ष वेधलेल्या तुळजापूर विधानसभेची  काँग्रेसकडून ॲड  धिरज  पाटील यांना अखेर उमेदवारी जाहीर 

नळदुर्ग,दि.२७: 
बहुचर्चित व सर्वांचे लक्ष वेधलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी शनिवार रोजी उशिरा महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाकडून अखेर उमेदवारी जाहीर करून ॲड कुलदीप ऊर्फ धीरज आप्पासाहेब कदम -पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.तर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका यापुढे काय असणार याबाबत मतदारसंघात चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी आघाडीवर असलेल्या अशोक जगदाळे यांच्या ही भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याकरिता अवघे काही दिवस राहिल्याने शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी  काँग्रेस पक्षाने 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्ये ॲड धिरज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी नळदुर्ग शहरात फटाक्याची  आतीषजी करून पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. निवडणुकीच्या मैदानात महायुती भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेसकडून जाहिर  करण्यात आलेल्या ॲड धिरज पाटील यांच्यात लढत होणार असली तरी राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे, अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ ढवळून काढले आहे.

  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वयाचे कारण पुढे करीत त्यांना उमेदवारी नाकारली आहे. मधुकरराव चव्हाण व अशोक जगदाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले आहे. पाच वेळेस आमदार राहिलेले व एक वेळेस विधानसभा लढविलेल्या मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली नाही. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरत प्रचार सुद्धा सुरू केल्याचे सर्वश्रुत आहे.      

 काँग्रेस पक्षाने राज्यातील पहिल्या 48 उमेदवारांच्या व दुसऱ्या 23 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये तुळजापूर मतदारसंघाची उमेदवाराचे नाव नव्हते. मात्र तिसऱ्या 16 उमेदवार यांच्या यादीत तुळजापूर मतदार संघातून धीरज कदम यांना उमेदवारी घोषित केली. काँग्रेसने आतापर्यंत 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील विश्वास शिंदे हे इच्छुक होते. त्यात कदम पाटील यांनी बाजी मारली.यापूर्वी दोन पाटील मध्ये एका कार्यक्रमात वाद निर्माण झाला होता. सध्या तरी तुळजापूर  विधानसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध पाटील अशी लढत रंगणार असल्याचे दिसत असले तरी उमेदवारी अर्जाची छाननी होऊन , माघारी घेतल्यानंतर  प्रचाराला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार, प्रचारात कोण बाजी मारणार त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

 
Top