वादळातल्या नंदा दिपातील प्राणज्योत अखेर मालवली
गेल्या सहा दशकापासून धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक समंजस नेता म्हणून नरेंद्र बाबुराव बोरगांवकर यांचे नाव सुपरिचित होते. स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाचे समर्पण करून आत्मबलिदानाचे अग्निदिव्य करणाऱ्या हुतात्मा बाबुराव बोरगांवकरांचे नरेंद्र बोरगांवकर हे द्वितीय सुपुत्र त्यांचा जन्म १३ जून १९३७ रोजी झाला. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने जिल्हयात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बोरगांवकर यांनी हैद्राबाद येथे कायद्याची पदवी संपादन केली .या व्यक्तीला नौकरी अथवा स्वतंत्र वकिली व्यवसाय करून खूप माया जमविता आली असती परंतू त्यांनी तसे न करता आपल्या पदवीचा उपयोग समाजकार्यासाठी व्हावा, या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी या कार्यास वाहून घेतले.
सदैव लोकांसाठी धडपडणाऱ्या नरेंद्र बोरगावकरांनी १९६२ साली राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९७४ पर्यंत त्यांनी तुळजापूर पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले. १९७० ते १९८१ पर्यंत त्यांनी धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहून त्यांनी पक्षाची प्रतिमा उजाळून पक्ष बळकट केला. त्या कार्याची पावती त्यांना १९८२ ला धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्वरूपात मिळाली. १९८२ पासून राजकारण सत्यासाठी आणि त्यागासाठी न राहता सत्ता आणि स्वार्थापलीकडे त्याची मर्यादा वाढत गेली. संघर्ष हे राजकारणाचे माध्यम ठरले , जाहिरातबाजी हे राजकारणाचे अंग बनले . पक्षापेक्षा स्वार्थ व सत्तेला महत्व देणाऱ्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्याने खरे बावनकशी सोने बाजूला फेकले गेले. कारण एप्रिल १९८९ मध्ये धाराशिव जिल्हा परिषद पुरोगामी लोकशाही दलाच्या प्रभावाखाली गेल्याने त्यांना अध्यक्ष पदाचा त्याग करावा लागला . पण सेवेच्या माध्यमातून पक्षाशी इमान राखून जे काय करता येईल तेच आपले राजकारण करणारे धिरोदत्त वृत्तीचे नरेंद्र बोरगांवकर नावाप्रमाणे संयमी व गंभीर बनून सत्ता संघर्ष टाळून सर्वसामान्य लोकांचा सतत जनसंपर्क ठेवला. त्यामुळे बोरगांवकरांचे निवासस्थान पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचे वारूळच बनले. या कालावधीत त्यांनी मोठ्या कौशल्याने पक्षनिष्ठ व संघटित कार्यकर्त्यांची फळी व साखळी तयार करून जनमताला प्रमाण मानून स्थिर राजकारणाचा खराखुरा पायंडा त्यांनी निर्माण केला. राजकीय कालावधीत राजकीय मंथनातून निर्माण झालेले कडवट जहर प्राशन केले व ते पचविले देखील . उदात्त आणि स्वच्छ मनाचा एक उदारमतवादी राजकारणी म्हणून ते सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींना परिचित झाले.
तुळजापूरच्या उघड्या बोडक्या माळरानावर ऊसाचा शिरपेच खोवणारे तालुक्यातील मरगळलेल्या शेतकऱ्यांत संजिवनी निर्माण करणारे नरेंद्र बोरगांवकर श्री. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना नळदुर्गचे संस्थापक अध्यक्ष बनले. या काळात आमदार मधुकरराव चव्हाण , आमदार कै. सिद्रामप्पा आलुरे गुरुजी आमदार कै. शिवाजीराव पाटील बाभळगांवकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती.
साखर कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विकासाला तणावातून निर्माण झालेले सर्व अडसर व अडथळे बाजूला सारून कारखान्याच्या विकासाला स्पर्धात्मक स्वरूप आणले. शेतकऱ्यांचे हित हे एकच ध्येय समोर ठेऊन त्यांनी कारखाना कर्जमुक्त केला. अगदी थोड्या अवधित साखर उद्योगातील एक अभ्यासू व तज्ञ संस्था प्रमुख म्हणून १९९१ - ९२ या वर्षासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या वर्षात त्यांनी केलेले काम पाहून पुन्हा एकदा १९९२- ९३ साली त्यांची फेरनिवड झाली. या काळात त्यांनी अनेक होतकरू व गरीब तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात नौकरीत सामावून घेतले. बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून दिला. निरक्षिताना झोपडी व घरकुलाद्वारे आसरा प्राप्त करून दिला. जिल्हा विकासाच्या अनेक योजना राबवून गोरगरीबांचा व्यक्तीविकास साधला.संयम , धिरोदत्तपणा व कर्तत्व हे नरेंद्र बोरगांवकर यांचे गुणविशेष होते. ज्या तळहातात आपल्या भाग्यरेषा असतात, त्याच तळहाताता लगतच्या मनगटातील कर्तत्वाने त्या भाग्य रेषा उजळाव्या लागतात .हे त्यांनी इतरांना शिकवलेले सैद्धात्विक मूल्य होते. आई- वडीलांनी ठेवलेले नरेंद्र हे नाव त्यांनी आपल्यातील संयमाने खरे करून दाखविले. यातच त्यांच्या निर्भिड नेतृत्वाचे गमक होते. हा लोकाभिमुख नेता राजकीय कालावधीत ज्या चपळाईने , जिद्दीने व जोमाने काम करायचा. ते पाहून अंगीभूत कर्तात्वस वयाचे बंधन नसते हेच प्रकर्षने जाणवायचे. कारण त्यांचा त्याकाळचा कामाचा उत्साह तरुणांना लाजविणारा होता. माझ्यासारख्या अनेक सुशिक्षित तरुणांच्या घरच्या अर्थिक परिस्थीतीची नाळ ओळखून त्याना नौकरी देऊन आयुष्यात उभे करून आयुष्याची भाकरी देणाऱ्या अन्नदात्याची आज प्राणज्योत मालवली ही काळीज हेलावून टाकणारी बाब आहे.
प्रा. डॉ. दिपक तुळशिदासराव जगदाळे ,
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग