संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता 

मुरुम, ता. उमरगा, दि. २८  : 

येथील सोनार गल्लीतील कुलकर्णी परिवाराच्या वतीने गतवर्षीपासून संत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करून ता. २२ ते २८ नोव्हेंबर पर्यंत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या दरम्यान दररोज महाराष्ट्रातील नामांकित प्रवचनकार, कीर्तनकार, भारुड कलाकार, गायन अशा विविध कार्यक्रम झाल्याचे आयोजक श्रीराम सुभाष कुलकर्णी यांनी सांगितले. सप्ताह समाप्तीच्या निमित्ताने संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी नगर प्रदक्षिणा बुधवारी (ता. २८) रोजी घालत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सोनार गल्लीतून पालखी नगर प्रदक्षिणा गांधी चौक, हनुमान चौक, अशोक चौक, कुंभार विहीर मार्गे किसान चौक, सुभाष चौक ते सोनार गल्ली अशी प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रत्येक चौकात टाळकरी बाल कलाकारांनी महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या वारकरी संप्रदायातील विविध कला प्रकार आपल्या अनोख्या पद्धतीने दाखवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यात बळीराजाची आपल्या बैलांप्रती असलेल्या आदराबद्दलचा कृतीभाव, नटखट अदाकारी करत फुगडी खेळ तसेच विठ्ठल रखुमाईच्या भक्तांनी निरागस भावनेतून दाखवलेला अनोखा भक्तीचा संगम याशिवाय विविध खेळांचे सादरीकरण या बालकलाकारांनी केले. पालखी सोहळा मार्गावर  भक्तांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. 

याप्रसंगी प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून आलेल्या पालखीचे उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा किसान चौकात दाखल  झाल्याबर टाळकरी वारकऱ्यांकरिता अल्पोपराची सोय केली होती.   सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार गुरुराज महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.    

          फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथे टाळकरी बाल कलाकारांनी महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या टाळकरी बाल कलाकारांनी महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या वारकरी संप्रदायातील विविध कला प्रकार आपल्या अनोख्या बळीराजाची आपल्या बैलांप्रती असलेला आदरभाव कृतीतून सादर करताना
 
Top