या वयात आम्हाला कोणातरी येऊन भेटतात याचं खूप कौतुक वाटतं.......आजीबाई बोलल्या
रोटरीकडून वृद्धाश्रमातील व्यक्तींना ब्लॅंकेट व फराळाचे वाटप
मुरूम, ता. उमरगा, ता. ५ :
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृद्धाश्रमातील लोकांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी रोटरीकडून विशेष उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी रोटरीयन दिनकर अरबळे व शरणाप्पा धुम्मा यांनी गरम ब्लॅंकेटची व्यवस्था केली. रोटरीच्या माध्यमातून या उपक्रमांतर्गत उमरगा चौरस्ता येथील इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्रात मुरूम येथील रोटरी क्लब मुरूम सिटीकडून सोमवारी (ता. ४) रोजी गरम ब्लॅंकेट व फराळाचे वाटप प्रत्येक व्यक्तीस करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलाकर मोटे होते. यावेळी सहप्रांतपाल अजित गोबारे, लोहाराचे विस्तार अधिकारी देविदास मुळजे, ट्रस्टचे व्यवस्थापक मारोती खमीतकर, सचिव सुनिल राठोड, गोविंद पाटील, सुभाष वैरागकर, परमेश्वर सुतार, बळीराम घोरवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रोटरीयन शिवशरण वरनाळे, डॉ. नितीन डागा, शरणाप्पा धुम्मा, उपप्राचार्य कलय्या स्वामी, प्रा. भूषण पाताळे, प्रा. राजकुमार वाकडे, सहशिक्षक कल्लाप्पा पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, सहशिक्षीका बबीता महानुर आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष कांबळे तर आभार प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मानले. या प्रसंगी येथील वृद्धांनी आभार व्यक्त करताना गरम ब्लॅंकेटमुळे हिवाळ्याच्या थंडीपासून आम्हाला मोठा दिलासा मिळाला, दिवाळीच्या फराळाचा स्वाद चाखायला मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसून आली आणि ओठांवर स्मितहास्य उमटले. अनेक दिवसांनी, एखाद्या सणाची अनुभूती मिळाल्याचा भाव त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत होता. काहींनी सांगितलं की, लहानपणी केलेल्या दिवाळीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू पण त्याचसोबत समाधानाचं हास्यदेखील होतं. या वयात आम्हाला कोणातरी येऊन भेटतात याचं खूप कौतुक वाटतं, असं एका आजीबाईंनी हळुवारपणे सांगितलं. तर काहींनी मिठाईची चव घेऊन, प्रेमाने आभार मानले. फराळामुळे त्यांना जणू कुटुंबाचं प्रेम मिळालं आणि त्यांच्या आयुष्यातील दिवाळीचा एक नवीन रंग खुलला होता. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
फोटो ओळ : ता. उमरगा येथील वृद्धाश्रमातील वृंदांना ब्लॅंकेट व फराळाचे वाटप करताना सर्व रोटरीयन पदाधिकारी व मान्यवर