प्रचारात पुढे महायुती, महाविकास आघाडीची मात्र कासवगती! ,तिसऱ्या आघाडीची कोणाला भीती?

 तुळजापूर,दि.०५ : शिवाजी नाईक 

विधानसभा निवडणूक प्रचाराला जेमतेम दिवस म्हणजेच दोन आठवडे उरले आहे. मतदान दि. 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार म्हणावा तसा वेग घेत नसल्याची चर्चा आहे. मी जनतेचा उमेदवार म्हणत उमेदवारी दाखल केलेल्या माजी मंत्री मधुकरराव चव्हाण अर्ज माघारी घेतल्याने त्यांच्या समर्थकात नाराजी असून ही नाराजी दूर करण्यास काँग्रेस यशस्वी होईल का? या नाराजीचा कुणाला फटका बसेल व कोणाला फायदा होईल याबाबत तुळजापूर मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.
तर महायुतीचे  उमेदवार प्रचारात सरस ठरताना दिसत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची प्रचारात घोडदौड सुरू असल्याची चर्चा मतदारात रंगत आहे. 

तुळजापूर मतदारसंघात महायुतीभाजपचे उमेदवार  विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, महाविकास आघाडी काँग्रेसचे ॲड धीरज पाटील, तिसऱी आघाडी प्रहार जनशक्ती पार्टीचे अण्णासाहेब दराडे, आणि समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी यांच्यात लढत होत असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.


 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात   निवडणुकीच्या रिंगणातून  २८ उमेदवारांनी   माघार घेतल्यानंतर आता २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशिब आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीच्या  रिंगणात १८ उमेदवार होते. सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 54 जणांनी  एकूण 87 अर्ज दाखल  केले होते.   

तुळजापूर मतदारसंघात  बंडखोरी झाल्यामुळे हा मतदारसंघ सर्वांचे लक्ष वेधले होते.  काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकवले होते.  परंतु अखेरच्या दिवशी चव्हाण यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज असल्याचे सूर ऐकवास मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी  केले होती.  जगदाळे यांनीही आपला अर्ज मागे घेतला.  त्याचबरोबर जीवन गोरे , ॲड व्यंकटराव गुंड, ऋषिकेश मगर, मुकुंद डोंगरे, संजय निंबाळकर यांनी अर्ज मागे घेतले. मराठा संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांच्याकडून इच्छुक असलेल्या सज्जनराव साळुंखे, महंत तुकोजी बुवा यांनीही अर्ज मागे घेतले. 

तुळजापूर मतदारसंघात  महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील निवडणुकी पुर्वीपासून विकास कामांच्या माध्यमातून मतदाराशी संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे ॲड धीरज पाटील यांचा अजुनही मतदारांशी म्हणावा तसा संपर्क नसल्याची चर्चा आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे अण्णासाहेब दराडे हे गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघात विविध समस्या, अडचणींवर प्रकाशझोत टाकत चित्ररथाव्दारे प्रयत्न करत मतदारांशी संवाद साधताना दिसुन येत आहे.त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे देवानंद रोचकरी कोपरा बैठक घेवुन आपली बाजु पटवुन सांगत आहेत. वंचितकडून  डॉ स्नेहा सोनकाटे हे मतदारसंघात संपर्क वाढवला आहे.

    
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह कंसात पुढीलप्रमाणे आहे.कुलदीप धीरज कदम पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - (हात),राणा जगजीतसिंह पाटील,भारतीय जनता पार्टी- (कमळ), अण्णासाहेब दराडे,प्रहार जनशक्ती पार्टी-बॅट,शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी,ऑल इंडिया मजलीस ए इन्कीलाब ई मिल्लत, (एअर कंडिशनर),धनंजय मुरलीधर तर्कसे पाटील,राष्ट्रीय समाज पक्ष- (शिट्टी),धीरज पंडित पाटीलआदर्श संग्राम पार्टी (लिफाफा),भैयासाहेब नागटिळे,आझाद समाज पार्टी (कांशीराम) -किटली, देवानंद रोचकरी, समाजवादी पार्टी- (सायकल), शरद पवार,संभाजी ब्रिगेड पार्टी (टिलर), सचिन शेंडगे,जनहित लोकशाही पार्टी (कपाट),डॉ.स्नेहा सोनकाटे,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), अमीर इब्राहिम शेख,अपक्ष (दूरध्वनी ),अमेर सरदार शेख,अपक्ष (संगणक),उज्वला गाटे,अपक्ष (बॅटरी टॉर्च), काकासाहेब राठोड,अपक्ष (अंगठी), योगेश शंकर केदार,अपक्ष (टेबल), तात्या पंढरीनाथ रोडे,अपक्ष (स्नॅपर), दत्तात्रय कदम,अपक्ष (ऑटो रिक्षा), धनाजी हुबे, अपक्ष (स्टम्प्स) अँड.पूजा देडे,अपक्ष (हिरा), मन्सूर अहमद मकसूद शेख,अपक्ष (जहाज),गणेश रोचकरी,अपक्ष (ट्रंपेट), सत्यवान सुरवसे,अपक्ष,द्राक्षे इत्यादी.

श्री तुळजाभवानीच्या दरबारात पुन्हा कमळ उमलणार की हाताचा पंजा करामत दाखवुन गत वैभव मिळविणार ?  की बॅटने सिक्सर  मारून धुव्वा उडवणार हे मतदान होवुन मतमोजणी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.


२४१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार ८०६ असुन त्यापैकी  पुरुष मतदार २ लाख १०६  तर स्त्री मतदार १ लाख ८० हजार ६९४ एवढे आहे. या मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील ७२ गावे, तुळजापूर तालुक्यातील १२३ आहे . तुळजापूर व नळदुर्ग नगरपालिका असे मिळुण एकुण १९५ गावाचा मतदारसंघात समावेश आहे. तर एकूण  मतदान केंद्र ४१० आहेत.
 
Top