अचलेर परिसरात वेळाआमवस्या उत्साहात ; शेतकऱ्यासह बालगोपालांनी लुटला वनभोजनाचा आनंद
अचलेर दि.३०
लोहारा तालुक्यातील अचलेर सह परिसरातील आष्टा कासार,आलूर,बोरगाव,सिंदगाव,सलगर,कुनसावळी,बेळंब , केसरजवळगा या भागात वेळा अमावस्या सण शेतकरी मोठया उत्साहात साजरा केला.यंदाही शेतकर्यांनी पारंपरिक पध्दतीने हा सण साजरा केला.
मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील सोलापूर , धाराशिव व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करण्यात आले.
या अचलेर व परीसरातील शेतकरी कुटूंबाने आपल्या नातेवाईकांसह मित्र परिवारा सोबत एकत्रीत वनभोजनाचा आनंद लुटला.वेळा अमावस्ये निमित्त सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासुन अनेक शेतकरी आपल्या बैलजोडीला सजावट करून त्याच बैलगाडीमध्ये आपल्या सर्व नातेवाईक,व मित्र व आपल्या परिवारासह डोक्यावर अंबीलाचे गाडगे घेऊन शेताकडे जात होते. शेतात गेल्यानंतर तेथे पारंपरिक पध्दतीने पांडवाची पुजाकरून काळ्याआईची ओटी भरण्यात आली. त्यानंतर सर्वांनीच वेळा आमस्या निमीत्त तयार केलेले पदार्थ,सर्व भाजीपाला एकत्रीत करून तयार केलेले भज्जी,ज्वारीचे,बाजरीचे उंडे, शेगा पोळी, खीर,आंबट भात,तसेच या सणाचा खास पदार्थ म्हणजे आंबील या पंच पकवानावर ताव मारला. वनभोजनाचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी बैलगाड़ी, मधून मोठ्या आनंदात घरी परत आले.व सायंकाळी वेळाआमवस्यां निमीत्त अचलेर चे पोलिस पाटील शिवपुत्र पाटील यांची मानाचे दिवे व म्हातारी डालाची मिरवणूक अचलेर गावातून काढण्यात आले.
मोठ्या उत्साहात येथील सर्व शेतकरी परिवार तसेच मित्रमंडळ,सर्व बालगोपाल एकत्रीत शेतामध्ये जमा होवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा आला .