तुळजापूर तालुक्यातील शेतकरी पवनचक्की कंपनीपुढे हतबल
चिवरी,दि.०५
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा, काक्रंबा ,बारुळ, होनाळा,गंधोरा, तीर्थ बुद्रुक, बसवंतवाडी, मानेवाडी, हगलूर, चिकुंद्रा , होर्टीआदी परिसरात मागील एक वर्षापासून पवनचक्की प्रकल्प उभरणा-या कंपन्यांचे पेव फुटले असुन परराज्यातील कंपन्या स्थानिक दलालांना हाताशी धरून अशिक्षित शेतकऱ्यांना लालुच दाखवून त्यांची दिशाभूल करून जमिनी ताब्यात घेत असुन पोलिस प्रशासनाच्या बळाचा गैरवापर करत दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार समोर आले आहे.
स्थानिक जमिनीचे दलाल यांच्या मार्फत दबाव तंत्राचा वापर जमिनी बळकावण्यासाठी करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाचा वापर करून शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. शेतक-यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी आर्थिक लाभापोटी कंपन्यांची पाठराखण करताना पोलीस प्रशासन दिसुन येत असल्याची खंत तुळजापूर तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.अजूनही तुळजापूर तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पाकामी घडामोडी सुरूच आहे. तालुक्यामध्ये जमिनींचे दलाल, गुंडांच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. यामुळे पवनचक्की कंपनी शेतकऱ्याच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे . एकंदरीत पवनचक्की कंपनीचा सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. मात्र याकडे जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाही. या प्रकरणी लोकप्रतिनिधीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.