शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे - नरवडे यांचा जिल्हास्तरीय प्रेरणा पुरस्काराने गौरव

तुळजापूर,दि.१९:

शालेय शिक्षण हे केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या तामलवाडी ता.तुळजापूर येथिल जि. प. प्राथमिक शाळेतील  उपक्रमशील शिक्षिका  शिंदे यांना समाज कल्याण विभाग धाराशिवच्या वतीने जिल्हास्तरीय प्रेरणा शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले .

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी सुनील खामीतकर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव ,महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक महादेव शिंदे ,मयूर काकडे , सच्चिदानंद बांगर या मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी नाट्यगृह धाराशिव येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .

ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांनी शिक्षण प्रक्रियेत तंत्रज्ञानाची सांगड घालून स्मार्ट शिक्षण संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे .त्यासाठी विविध शैक्षणिक साधने , मुलांचे अनुभव विश्व , विद्यार्थ्यांच्या आवडी व पाठ्यपुस्तक यांची सांगड घालून मुलांचे शिकणे ही आनंदही केले आहे .शिक्षण प्रक्रियेत पालक हाही घटक महत्त्वपूर्ण असून पालकांचे ही मुलांच्या शिक्षणात सहकार्य घेत पालक -विद्यार्थी - शिक्षक या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करून मुलांच्या शिकण्यातील उत्साह वाढवला आहे . विद्यार्थी फक्त अभ्यासातच नव्हे तर जीवनातील इतर कौशल्यांची ही रुजवन विद्यार्थ्यात व्हावी , व्यवहार ज्ञानाचे धडे शाळेतूनही गिरवले जावेत यासाठी त्या सदैव प्रयत्नशील असतात .

लहान मुलांचे केलेले कौतुक हे त्यांचा आत्मविश्वास वाढवते व त्यांच्यात अधिक काही शिकण्याची प्रेरणा भरण्याचे ही काम करते .दैनंदिन अध्यापनात चांगला प्रतिसाद व उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मुलांसाठी सेल्फी विथ सक्सेस या स्लोगन अंतर्गत त्यांचे प्रसिद्धी माध्यमावर पोस्टही करून वेगळा अनुभव मुलांना देतात . या सह मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून सहजपणे मुले अभ्यासात गुंतवून शिक्षणाचे उद्दीष्ट सहज साध्य करणे ही तर त्यांची हातोटी . मुलांना क्रियाशील बनवण्यासाठी नवनिर्मितीचे धडे कार्यानुभव या विषयातून ते नित्याने देतात . या विविध शैक्षणिक गुण वैशिष्ट्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे .

शिक्षण क्षेत्रातील प्रभावी व परिणामकारक कार्य , दिव्यांग असूनही सामाजिक क्षेत्रात दिलेली योगदान व समाज शिक्षकाची निभावलेली भूमिका पाहून समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांनी त्यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार दिला आहे .त्यांच्या सन्मानाबद्दल मुख्याध्यापक सोमदेव गोरे ,शाळा समिती अध्यक्ष सोनाली कर्वे ,उपाध्यक्ष असिफ शेख , अफसर शेख ,  मिलन सोनवणे , स्मिता पाटोळे , अनुराधा पाटील , रविकांत भिसे ,योगिता माने ,  प्रणिता कांबळे , जयश्री राऊत , शिल्पा तांदळे  यासह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .


 
Top