कुरनूर प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी रु १४ कोटींची हिवाळी अधिवेशनात तरतूद, कामास प्रारंभ : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

 तुळजापूर,दि.१९ :

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील ५५ वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

 दुरूस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी वितरण होत नसल्याने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला फटका सहन करावा लागत आहे. वितरण व्यवस्थेत सुधारणा, अस्तरीकरण आणि बांधकाम दुरूस्तीसाठी २९ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता १० गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी आहे. आजवर कालव्याचा झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरूस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग ५० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. सिंचन अवर्तनाचा कालावधीतही त्यामुळे वाढ झाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाल्याचे तसेच अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचेही निदर्शनास आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

मागील ५५ वर्षांत या कालव्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे परिसरातील गावांना त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी बांधवांनी उपोषण केले. अनेकांनी आत्मदहनाचे पत्र दिले. रब्बी आणि उन्हाळी हंगामात कालव्याच्या नादुरूस्तीमुळे अनेकांच्या पिकाला पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, सिंचन क्षेत्रामध्ये झालेली घट दूर व्हावी आणि सिंचन क्षेत्र वाढावे, याकरिता वितरण व्यवस्थेच्या अस्तरीकरण आणि त्यावरील बांधकाम दुरूस्तीसाठी महायुती सरकारकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी तब्बल २९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होत. त्यामुळे कालव्याच्या लाभ क्षेत्रातील वरील १० गावांमधील शेकडो शेतकरी बांधवांची मागणी महायुती सरकारमुळे पूर्णत्वास येणार आहे. नागपूर येथील  हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने महायुती सरकारने १३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. १० किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्यासह २४ किलोमीटर लांबीच्या पाणीवितरण व्यवस्थेच्या कामाचे अस्तरीकरण आणि बांधकाम कामाची निविदा यापूर्वीच ७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. मागील ५५ वर्षांपासून दुरूस्ती अभावी रखडलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या दहा गावातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पाणी लवकरच उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याने आता कामास सुरुवात झाली असून या रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यात येणार असून हे करत असताना याच्या दुरुस्तीचे आव्हानात्मक काम करण्याचे ठरवले आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांचे पाण्याअभावी होणारे नुकसान टळणार आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पावर आधारित असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंद  पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
 
Top