पवनचक्क्या बसविण्याचा उच्छाद, दलालांचा सुळसुळाट, प्रशासनाचे  दुर्लक्ष , नागरिकांच्या सुरक्षेप्रकरणी भाजयुमोची जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव 

नळदुर्ग,दि.१८ :

पवनचक्कीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असुन या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी नळदुर्ग शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.


तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या जात असून याचा प्रामुख्याने तुळजापूर तालुक्यातील बसवंवाडी, बारुळ,बोरनदवाडी, चिवरी,हगलुर,मानेवाडी,गंधोरा, सलगरा, होर्टी,  मुर्टा, चिकुंद्रा, अणदुर या गावाच्या शिवारात जवळपास ५० पेक्षा अधिक पवनचक्की बसविल्याची माहिती समोर आली आहे.

एका पवनचक्कीला सात एकर जमीन अकृषी लागते शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल किमतीने तीस वर्षाचा करार करून ताब्यात घेत आहेत. त्याठिकाणी जागेसाठी अनेकांच्या जमिनीवर रातोरात मुरूम टाकून व महामार्गावरील झाडे अनाधिकृतपणे तोडून पवनचक्की युद्ध पातळीवर उभारले जात असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक की अर्थपूर्ण व्यवहाराने दुर्लक्ष करीत आहे. हे अनाकलनीय आहे. या सर्वच बाबीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो रुपयाची मुरूम रॉयल्टी न भरता महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाची परवानगी न घेता रस्ते निर्मिती करीत असून भविष्यात हे डोकेदुखी ठरणार आहे. 

अणदुर ता.तुळजापूर शिवारात असलेल्या एका गॅस गोडाऊनच्या दुतर्फा पवनचक्की उभारली आहे. गॅस गोडाऊन च्या परिसरात वीज पडेल असे टावर, मनोरे बांधता येत नाही. असे असतानाही पवनचक्क्या उभारणाऱ्या कंपन्या सर्व नियम पायदळी तुडवून मनमानी करीत असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या भवितव्यासाठी वरील गॅस गोडाऊन इतरत्र हालवावे किंवा पवनचक्की टावर दुसरीकडे स्थलांतर करावे, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नळदुर्ग शहराध्यक्ष गणेश मोरे, उपाध्यक्ष अक्षय भोई, विजय ठाकुर, राहुल ठाकूर आदीनी निवेदनाव्दारे धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनाची प्रत  तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील , छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त, धाराशिव पोलिस अधिक्षक,  तुळजापूर तहसिलदार आदींना पाठवण्यात आले आहे.

 
Top