तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद ग्रामपंचायतला दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाचे विशेष  निमंत्रण 

जळकोट, दि.२१: तुळजापूर तालुक्यातील विविध पुरस्कार प्राप्त असलेल्या आलियाबाद ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच यांना सपत्नीक नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिन व परेडसाठी उपस्थित राहण्याचे  विशेष निमंत्रण आले आहे. 
धाराशिव जिल्ह्यातून आलियाबाद ग्रामपंचायतला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. 

आलियाबाद ग्रामपंचायतने नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अनेक योजना  राबवल्या आहेत. या ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून सलग ५० वर्ष  दलितमित्र स्व. मोतीराम नंदू चव्हाण यांनी काम केले होते. आलियाबाद सारख्या तांड्यामध्ये त्यांनी प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा सुरू केली आहे. आजही या भागातील  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्व. मोतीराम चव्हाण यांच्या कार्यामुळे आलियाबादचे नाव चर्चेत होते. त्याच पद्धतीने पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व त्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच सौ. ज्योतिका चव्हाण यांच्या कार्यकाळात आलियाबादचे नाव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व गावकऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवर नेले. आलियाबाद  तांड्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने चव्हाण यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते पर्यावरण विकास रत्न पुरस्कार मिळाला होता. 

महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला होता. तर  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरावर गौरवण्यात आले होते. त्याचबरोबर प्रकाश चव्हाण व ज्योतीका चव्हाण यांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. स्मार्ट  व्हिलेज जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलियाबाद ग्रामपंचायतने पटकावला होता.
सध्या या ग्रामपंचायतवर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांचे बंधू सूर्यकांत चव्हाण हे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान सरपंच सूर्यकांत चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांना  भारतीय प्रजासत्ताक दिनाला व परेड साठी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले आहे. राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतच्या सरपंचाची प्रजासत्ताक दिनासाठी निवड झाली आहे. तर धाराशिव जिल्ह्यातून आलियाबाद ग्रामपंचायत निवडण्यात आली आहे. आलियाबाद ग्रामपंचायतला भारतीय प्रजासत्ताक दिन व परेडसाठी उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण आले आहे. प्रत्यक्ष प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे भाग्य आलियाबाद ग्रामपंचायतला मिळणार आहे. या निवडीबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यासह अनेकानी अभिनंदन केले आहे.
 
Top