लोहगाव - नळदुर्ग रस्त्याच्या कामात दिरंगाई करणार-या अधिकारी व ठेकेदाराविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
नळदुर्ग, दि.१५ :
लोहगाव ते नळदुर्ग रस्त्याच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने समस्त लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता नळदुर्ग येथील आलियाबाद पुलात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, लोहगाव ते नळदुर्ग या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापूर्वी पासुन
संथ गतीने सुरु असून रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे व अनेक ठिकाणी अर्धवट निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकासह नागरिकांना नाहकच त्रास होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर मारून साईडपट्टी वरील झाडे व अतिक्रमण काढून साईड पट्टी मोकळी करणे गरजेचे असताना आहे त्याच अरुंद रस्त्यावर खडी व दगड, गोटे टाकण्यात आल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.
एक वर्षापासून रस्त्याचे काम रखडले असून कामात दिरंगाई केली जात आहे. परिणामी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच एसटी बस सेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याप्रकरणी अनेक वेळा वारंवार संबंधितांना तक्रार करून सुद्धा संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तात्काळ संबंधित बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी आलियाबाद पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनाची प्रत खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील, धाराशिव पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव, तुळजापूर व तुळजापूर तहसीलदार , नळदुर्ग पोलीस निरीक्षक , आदिना देण्यात आली आहे.
निवेदनावर लोहगाव ता.तुळजापूर येथिल शिवसेना शाखाप्रमुख रविंद्र दबडे, सामाजिक कार्यकर्ते संजय घोडके , शालेय कमिटी अध्यक्ष राहुल शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख , अरुण कदम, प्रभाकर कलशेट्टी यांच्यासह ५२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.