अणदुर रस्ताप्रकरणी संबधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास उदया १७ फेब्रुवारी रोजी तुळजापूर तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा

अणदुर,दि.१६ :

अणदूर  ता.तुळजापूर येथील रस्ता बांधकामात अडथळा येणाऱ्या सर्वेक्षण क्र.१५५ या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे न काढल्यास व  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास येत्या १७ फेब्रुवारी रोजी तुळजापूर तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
      
याबाबत शिवसेना (उबाठा)गटाचे माजी तुळजापूर तालुकाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके-पाटील यांनी सोमवारी (ता.१०) तुळजापूर तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक ते खंडोबा मंदीर रस्त्यालगत दोन्ही बाजूने अतिक्रमणे झाली आहेत. कांही दुकानदार तावण भरुन दुकाने चालवत होती.सध्या तिर्थक्षेत्र विकास योजनेतून जवळपास २कोटी रुपयाचे सिमेंट रस्ता काम सुरु आहे. त्यास अतिक्रमण धारकांचा अडथळा होत आहे.रस्त्याच्या एका बाजूला खाजगी प्लाँटधारक आहेत त्यामध्ये रस्ते स्वतःच्या ले-आउट मधून उपलब्ध करुन देणे गरजेचे होते.परंतू मुख्य रस्त्यालगतच्या प्लाँटधारकांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.
    
शिवाय रस्ता कामाचे अंदाजपत्रक बनविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूला नाली बांधकामाचे नियोजन करणे गरजेचे होते परंतू तसे केले नाही.नागरी वस्ती व पावसाचे  रस्त्यावर येणारे पाणी कुठे जाणार याचे कोणतेही नियोजन केले नाही.त्यामुळे चुकीचे अंदाजपत्रक बनवून शासनाचे करोडो रुपये वाया जाणार आहेत.सदरील प्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा येत्या सोमवारी दि.१७ फेब्रुवारी रोजी तुळजापूर तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा घोडके-पाटील यांनी दिला आहे.

अतिक्रमण धारकांना कोण सक्षम अधिकाऱ्याने किती जागा दिली आहे हे निश्चित नाही.पकडलेल्या शासकीय जागेचे अनधिकृत खरेदीविक्रीचे व्यवहार होवून अनेक धनदांडग्यांनी लाखो रुपये लाटले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.जिल्हाधिकारी व ग्रामपंचायत कार्यालयात निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.
         
करोडो रुपयांचे विकासकामे सध्या सुरु असून एकाही ठिकाणी कामाची माहिती देणारे फलक लावले नाहीत.कामावरील जबाबदार अभियंता,कंत्राटदार कधी येतात कधी जातात याचा थांगपत्ता लागत नसल्यांची नागरिकांची ओरड आहे. ही कामे नागरिकांच्या सोयीसाठी नसून मागील पाच वर्षात झालेल्या सर्व विकासकामांचा  बट्याबोळ केलेल्या लाडक्या व मर्जीतील कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी आहेत अशी  कुजबूज ग्रामस्थात सुरु आहे.काम करण्यापुर्वी सर्वंकष विचारविनिमय होणे गरजेचे असताना नागरिकांनी तक्रारी अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतीला जाग येते आणि मग  बैठकांचे आयोजन केले जात असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांबद्धल नागरिकांत तीव्र असंतोष पसरला आहे.
 
Top