तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ


चिवरी ,दि.१६: राजगुरू साखरे

 महाराष्ट्रासह परप्रांतीय  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी  येथील महालक्ष्मी यात्रोत्सवास मंगळवार दि, १८ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.  महालक्ष्मीची यात्रा प्रथेप्रमाणे दरवर्षीच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरी केली जाते. यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे. 

देवीजींना सोमवार  मंगळवारच्या मध्यरात्री  महाअभिषेक , अलंकार पूजा करून महाआरती केली जाते,  त्यानंतर आंबट-गोड भातासह पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो. पहाटे गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडला जातो, या गावातील शेकडो भावीक सहभाग नोंदवितात .मंगळवार  हा यात्रेचा मुख्य असतो , या दिवशी  नवीन पोतराजांना दीक्षा देणे , दंडवत घेणे  , पट  बांधणे ,  लहान मुलांचे जावळ काढणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात, तसेच वाघ्या मुरळी, आराधी पथके, यल्लमाची गाणी, धनगरी ओव्या, पोतराज गाणी,  अशा महाराष्ट्रीयन लोक कलेचे धार्मिक कार्यक्रम होतात. 

देवीच्या दर्शनासाठी लातूर, धाराशिव, बीड, मुंबई, पुणे आदीसह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात.  मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील, मराठा-पाटील यांच्या वाड्यावर जाणे, घोंगड्यात भात झेलणे,आदी मानपानाच्या विधी  पार पडतात. मंगळवारी रात्री गावातून देवींची शोभेच्या दारूकामासह पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येते व पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थान होऊन रात्री बारा वाजता मंदिराकडे पालखी प्रस्थान होते. यानंतर होमावहनामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. 

तसेच बुधवारी दि,१९ रोजी सकाळी सात वाजता पान व लिंबु याचा घाव होऊन यात्रेची सांगता होते.तसेच बुधवारी  सायंकाळी मंदिरामध्ये एकही यात्रेकरू थांबत नाही मंदिर निर्मनुष्य होते, येथे सायंकाळी भुताची यात्रा भरते अशी आख्यायिका आहे. विशेष म्हणजे या यात्रेमध्ये  हजारो पारधी समाज दाखल होतो, चिवरी येथील महालक्ष्मीच्या यात्रेला महाराष्ट्सह शेजारच्या परप्रांतीय   भाविक  दाखल होतात
 
Top