मुरुम येथे विविध ठिकाणी शिवजन्मोत्सवाचा जागर ;
शाळा महाविद्यालयासह मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती, शिवजन्मोत्सव समिती किसान चौक, शिवप्रेमी प्रतिष्ठान, शहादत मोहल्ला शिवजयंती आदींच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा जागर
मुरुम,दि.२०: डॉ सुधीर पंचगल्ले
शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सुत्र विश्वाचे की असा अभंग राष्ट्रसंत तुकोबारायांनी शिवरायांप्रति व्यक्त केला आहे, त्यामुळे आजही या युगपुरुषाचे नाव ऐकल्यावर घराघरातल्या आईला वाटते असा पोर माझ्या पोटी जन्माला यावा असे जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम पुत्र असणाऱ्या कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शहादत मोहल्ला, किसान चौक व विविध शाळा महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने किसान चौक येथील शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रामहरी अंबर शिवप्रेमी प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती चे अध्यक्ष विशाल मोहिते मध्यवर्ती शिवजयंती समितीचे अध्यक्ष अल्फान दिवटे व मुरूम शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी गव्हाणे यांच्या हस्ते मूर्ती पुष्पहार घालून त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करीत शहरातील वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी किरण गायकवाड अजित चौधरी आनंद कांबळे श्रीकांत मिनीयार प्राचार्य दत्ता इंगळे मोहन जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मान्यवरांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अतिशय उत्तुंग आहे. शिवरायांचे नुसतं नाव घेतलं, की आपल्या अंगावर काटा उभा राहतो. अशा क्रांतिकारी महापुरुषाची जयंती एकदम उत्सवाचा अन् आनंदाचा क्षण असुन संपूर्ण महाराष्ट्रातील चौकाचौकात जल्लोष सुरु राहील. हा भव्य वारसा जपण्यासाठी, त्यांचं गुणगाणं जेवढं आवश्यक आहे, तितका त्यांच्या चरीत्राचा अभ्यास करुन त्यांचे चांगले गुण आत्मसात करणंही आवश्यक आहे. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवारायांच्या आयुष्याचं अवलोकन करताना, आपली मान थिटी पडते, इतकं उत्तुंग ते चरित्र आहे. पण यशस्वी लोकांच्या आयुष्यात आपल्यासाठी प्रेरणा लपलेल्या असतात. आपल्या या जगावेगळ्या जाणत्या राजाचं वेगळेपण शोधण्याचा आणि त्यातुन शिकण्याचा, आपण सर्वांनी वेळोवेळी, नक्कीच प्रयत्न करायला हवा.
यानंतर किसान चौक येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील सर्वच प्रमुख मार्गावरून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवरायांच्या नावांचा जयघोष करीत उत्साहात रॅली किसान चौकाकडे मार्गस्थ होत असताना कुंभार विहीर येथील सैदा संयदा गल्ली येथील शहादत मोहल्ला येथे रायझिंग स्टार क्लब च्या वतीने छत्रपती शिवरायांच्या मूर्ती क्लबचे अध्यक्ष राशीद जमादार किसान चौक शिवजयंती चे अध्यक्ष रामहरी अंबर उपाध्यक्ष महेश जाधव पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅली पुढे मार्गस्थ झाली. शहरातील सर्वात जुनी व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या किसान चौक येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन आरुढ मूर्तीस सुरेश मंगरूळे, राजू भालकाटे, अमृत वरनाळे, सुधीर चव्हाण, भगत माळी, राहुल वाघ, दादा बिराजदार, दत्ता हुळमजगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. तेजस्विनी सोनवणे व सहकारी यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाल व्याख्याती शिवकन्या भालकाटे हिचे व्याख्यान संपन्न झाले. त्यानंतर रक्तदान व आरोग्य शिबिर तसेच किसान क्रेडिट कार्ड शिबिराचे उद्घाटन सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आरोग्य शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला तर 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिवाय असंख्य शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढून घेतले. त्यानंतर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर शिवप्रेमी प्रतिष्ठानाच्या वतीने सायंकाळी सर्व परिसरातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना करून शिवरायांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वच समितीच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शहरातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण गायकवाड सूत्रसंचालन मोहन जाधव तर आभार अल्फान दिवटे यांनी मानले. शहर व परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यासाठी अनेक जणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.