महाकुंभ - महाव्यवस्थापनाचा मानदंड!
श्रीकांत प्रभुदेसाई यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट!
त्रिवेणी संगमाच्या जसे जवळ जावे तसे तिथे तर लोकांचा महासागर उसळलेला होता. बरोबरचा माणसाचा एक सेकंद हात सुटला तरी परत सापडणं अवघड, इतकी गर्दी. मात्र प्रशासनाने अनेक ठिकाणी 'खोया-पाया केंद्र' स्थापन केली होती व तेथून होणारी अनाउन्समेंट ही संपूर्ण कुंभ परिसरात ऐकू जाईल अशी ध्वनि यंत्रणा केलेली होती. त्यामुळे हरवलेली एखादी व्यक्ती नेमकी कुठे आहे हे अनाउन्समेंट वरून लगेच लक्षात येत होते. तसेच संगम स्थानी प्रत्येक खांबाला वेगळा नंबर दिलेला होता त्यामुळे आपले पर्जन नेमके कुठे आहेत हे एकमेकांना कळवणे सहज शक्य होत होते. संगमस्थानी खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्यासाठी कपडे बदलण्याचे बंदिस्त आडोसे तयार केलेले होते. त्यामुळे महिलांची अजिबात गैरसोय होत नव्हती....*
माघी पौर्णिमा, दि.१२ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये जाण्याचा सुयोग मला लाभला, हे माझे भाग्यच! मी श्रद्धावान असलो तरी गर्दीच्या, जत्रेच्या ठिकाणी जाण्याचे मी नेहमी टाळतोच. देवदर्शन हे शक्यतो शांतपणे, मनसोक्त व्हावे असा माझा स्वभाव. मात्र गेले चार-सहा महिने कुंभमेळ्याची तयारी, त्याच्या आयोजनातील अवाढव्यपणा आणि तितकाच नेटकेपणा, परिपूर्णता याविषयी सर्व माध्यमातून जी माहिती मिळत होती, ती पाहता हा अपूर्व योग तर आपण साधायलाच हवा अशी भावना होऊ लागली. परंतु त्याही पेक्षा व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी म्हणूनही आपण या कुंभमेळ्यात जायला हवे, असा मनाचा निर्धारच झाला.
कुंभमेळ्याविषयी अतिप्रचंड माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे त्याविषयी पुनरुक्ती करण्याचा माझा विचार नाही. मात्र व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीकोनातून हा कुंभमेळा म्हणजे जगातील एक अद्भुत आयोजन होते, याबाबत मला कोणतीही शंका उरलेली नाही.
मुळात कुंभमेळ्याचे क्षेत्र अतिशय छोटे, म्हणजे साधारणतः १५ वर्ग किलोमीटर. म्हणजे एखाद्या छोट्या शहरापेक्षाही लहान. तरीही या जागेमध्ये कोट्यावधी लोकांची तात्पुरती व्यवस्था कशी उभारली असेल?
दुसरी गोष्ट म्हणजे कुंभमेळा गंगेच्या व यमुनेच्या संगम क्षेत्रात म्हणजेच पूरक्षेत्रातील वाळवंटामध्ये भरतो. अशा वाळवंटात भुसभुशीत जागेत इतकी प्रचंड व्यवस्था कशी उभी केली असेल? हा ही कुतुहलाचा विषय होता. कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दोन्ही नद्यांच्या पुराचे 15-20 फूट उंचीचे पाणी भरलेले असते. इतक्या प्रचंड प्रमाणात येणाऱ्या जनसंख्येच्या, दीड दोन महिना टिकतील अशा आवश्यक त्या सर्व व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभाराव्या लागणार होत्या. यामध्ये या लोकांचा निवास, आहार आणि संडास बाथरूम आदि सर्व शारीरिक गरजा आल्या. हे कसे शक्य होणार? हा देखील मूलभूत प्रश्न होता.
आपल्या महाराष्ट्रातला अनुभव असा आहे की काही लाख लोकांची आषाढी-कार्तिकी वारी ज्या भागातून जाते त्या भागातील गावातील लोक वारीनंतर महिना महिना आपले गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. इतकी बिकट अवस्था त्या गावांची होत असते. वारीमध्ये लोक एका जागी एक किंवा फार तर दोन दिवस राहतात. इथे महा कुंभात तर सतत दीड महिना वारीच्या 50 पट जास्ती लोकसंख्या विशिष्ट क्षेत्रात राहणार होती.
या सर्व प्रश्नांना कसे सोडविले याबाबत प्रत्यक्ष पाहूनच मत बनवावे, ही एक भावना महाकुंभाला जाण्यामागे होती.
मी महाकुंभात पोहोचलो तेव्हा मेळा सुरू होऊन सुमारे तीस दिवस झालेले होते. तीस दिवसांमध्ये या क्षेत्रामध्ये ४० कोटी लोक येऊन गेले अशी आकडेवारी सांगत होती. त्यामुळे त्या क्षेत्राच्या जवळ जाताच दुर्गंधीचा प्रचंड सामना करावा लागेल या मानसिक तयारीत मी होतो. त्याचप्रमाणे कचऱ्याचे, प्लास्टिकचे डोंगरच्या डोंगर पाहण्याची देखील मनाची तयारी केलेली होती. परंतु प्रामाणिकपणे सांगतो - यापैकी कोणतेही दृश्य मला कुंभामध्ये दिसले नाही. तात्पुरते उभारलेले हजारो संडास असूनही व ४० कोटी लोकांच्याकडून त्याचा वापर झालेला असूनही परिसरामध्ये नावालाही दुर्गंधी नव्हती. उलट अतिशय प्रसन्न वातावरण होते.
कुंभामध्ये तीन दिवस फिरत असताना कचऱ्याचे डोंगर तर सोडाच, कचराच दिसला नाही. सफाई कर्मचारी सातत्याने सफाई करत होतेच, परंतु या करोडो लोकांमध्ये देखील अलीकडच्या काही वर्षातील सरकारच्या प्रयत्नामुळे आलेली स्वच्छतेची जागृती बऱ्याच प्रमाणात जाणवत होती.
हजारो संस्था व नागरिकांनी येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य अन्नभंडारे चालवले होते. त्यामुळे भक्तांना अन्नावरती खर्च करण्याची अजिबात गरज नव्हती. भंडाऱ्यांमध्ये बनवले जाणारे जेवण स्वच्छ व सात्विक असल्यामुळे कुणाच्या तब्येती देखील बिघडल्या नाहीत. पूर्व नियोजन केल्यामुळे सर्व भंडार्यांमध्ये स्टीलच्या ताटवाट्या वापरल्या गेल्या. त्यामुळे कागदी व प्लॅस्टिक पत्रावळ्या, पाण्याचे प्लास्टिकचे ग्लास याचेही बिलकुल दर्शन झाले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी सरकारने जागोजागी विनामूल्य आर ओ वॉटर प्लांट लावलेले होते. त्यामुळे खूप चालायला लागले तरीही लोकांना पाण्यावरती खर्च करावा लागत नव्हता.
या करोडो लोकांच्या साठी संडासची व्यवस्था कशी केली असेल हा एक मला मोठा प्रश्न पडलेला होता. पण या परिसरामध्ये सरकारने जी हजारो पक्की तात्पुरती टॉयलेट्स उभारली होती त्यांची सातत्याने सफाईची व्यवस्था केलेली होती. आणि शिवाय सेप्टिक टॅंक मधील मैला रोजच्यारोज उचलण्यासाठी टँकरची चोख व्यवस्था होती. त्यामुळे सर्व नागरिकांना स्वच्छ, आरोग्यपूर्ण, दुर्गंधीरहित व्यवस्था उपलब्ध झाली व महाकुंभमेळा परिसर निर्मळ व पवित्र राहिला.
गंगा यमुनेच्या दोन्ही तटांवर मेळा असल्याने नदीपलीकडील आखाड्यात जायचे तर मोठा वळसा मारावा लागणार व असलेले पक्के पूल वाहतूक कोंडीमुळे कुचकामी ठरणार, याबाबत सरकारने विचारपूर्वक आधीपासून तयारी केलेली होती. गंगेवर काही नव्या पक्या पुलांची निर्मिती केलेली होतीच. त्या व्यतिरिक्त केवळ या पाच-सात किलोमीटर परिसरात २५ तात्पुरते पूल उभारले होते. मात्र हे तात्पुरते पूल इतके भक्कम होते की त्याच्यावरून ट्रक देखील सुरक्षितपणे जाऊ शकतील. मोठमोठे हवाबंद टँकर नदीपात्रात अंथरून त्यावरून जाड लोखंडी प्लेट्स टाकून तात्पुरते, तरीही पक्के पूल उभारलेले होते. याला पॉंटून ब्रिज किंवा स्थानिक भाषेत पीपा पूल असं म्हटलं जात होतं. असा एक पूल तयार करण्यासाठी सुमारे ११० टँकर लागत होते. व असे ३० पूल केलेले होते. यामुळेच सर्व परिसरात येणेजाणे अतिशय सुलभ झाले.
हा सर्व परिसर वालुकामय आहे आणि इतक्या लोकांना ये-जा करण्यासाठी, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व गरजांच्या साहित्याची वाहतूक करणे यासाठी रस्ते उभारणे हे देखील एक आव्हानच होते. यासाठी सरकारने वापरलेली पद्धत माझ्यासाठी अभिनवच होती. कदाचित अशा प्रकारचे तंत्रज्ञान सैन्यांमध्ये वापरले जात असेल. वाळूमध्ये जाड जाड अशा लोखंडी प्लेट्स अंथरून, त्या प्लेट्स एकमेकांना जोडून मोठमोठे रस्ते तयार केलेले होते. एकेका प्लेटचे वजन तीनशे किलो असेल असे सोबतच्या व्यवसायाने इंजिनीयर असलेल्या मित्राने सांगितले. रस्त्यांसाठी पाच-पंचवीस लाख प्लेट्स चा वापर नक्कीच केला गेला असेल. या प्लेट्स च्या रस्त्यांमुळे या संपूर्ण परिसरात कोठेही एकही वाहन वाळूत किंवा चिखलात रुतलेले व त्यामुळे झालेली वाहतुक अडचण दिसली नाही. प्लेट्स वर येणारी वाळू व त्यातून जाणारे करोडो लोक व जाणारी वाहने यांच्यामुळे परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण होईल हे लक्षात घेऊन दिवसातून ठराविक अंतराने रस्त्यांवर पाणी मारण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे ही हवाप्रदूषण पूर्णपणे टाळले होते.
महाकुंभ परिसरात एक मोठे रुग्णालय उभारलेले आहे, ज्यामध्ये अतिदक्षता विभाग देखील होता. तेथील सेवा देखील दिवसरात्र व तत्परतेने मिळत होत्या. सामान्य व तज्ञ डाॅक्टर्स व आवश्यक तो पॅरामेडिकल स्टाफ, औषधे, सलाईन बाॅटलस् आदि सर्वाची पर्याप्त तयारी होती. अनेक रुग्णवाहिका देखील रुग्णसेवेसाठी सज्ज होत्या.
जागोजागी अग्निशामक यंत्रणा देखील तयार होती. या परिसरातील सर्व उभारणी कापडी मंडपांच्या सहाय्याने झालेली होती व कोट्यावधी लोकांसाठी दररोज दिवसरात्र अन्न शिजत होते. त्यामुळे कुठेतरी आग लागण्याचा धोका होताच. तशा १~२ घटना घडल्या सुद्धा. पण पूर्व तयारी मुळे फारशी हानी न होता आग विझवणे शक्य झाले.
या परिसरामध्ये रात्री देखील दिवसाप्रमाणे उजेड राहील अशी विद्युत व्यवस्था केलेली होती. या हजारो खांबांची गेल्या दोन-चार महिन्यात उभारणी केली होती असे स्थानिकांकडून कळले. अचानक वीज गेल्यामुळे गोंधळ होणे व त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होणे अशा घटना भारतामध्ये आपण अनेक वेळा बघतो. परंतु अशा प्रकारची एकही घटना कुंभमेळ्याच्या दीड महिन्यात झाली नाही.
प्रचंड गर्दीमुळे शेवटच्या ठिकाणापर्यंत मोठी वाहने सोडणे अशक्यच होते. मात्र मोठ्या प्रमाणात ई-रिक्षा उपलब्ध होत्या. त्यांच्यामुळे लोकांची मोठी सोय होत होती आणि ध्वनी व वायू प्रदूषण ही टळत होते. याहीपेक्षा एक अभिनव गोष्ट म्हणजे प्रशासनाने स्थानिक युवकांना लोकांची ने-आण करण्याची परवानगी दिली असावी (कदाचित अनधिकृतपणे). असे हजारो स्थानिक तरुण आपल्या मोटारसायकलसह दिवसरात्र राबत होते. त्यामुळे या युवकांना चांगला रोजगार मिळालाच व लोकांची ही मोठी सोय झाली.
विविध प्रांतातून करोडो लोक येणार म्हणजे लाखो वाहने येणार हे तर सरळच आहे. या लाखो वाहनांना आवश्यक ते डिझेल-पेट्रोल केवळ या दीड महिन्याच्या काळात कैकपट अधीक प्रमाणात उपलब्ध करणे ही देखील फार मोठी व्यवस्था होती. याबाबत ही कोणत्याही वाहनाची गैरसोय झाली नाही.
इतक्या लोकांच्यासाठी लागणारे अन्न तयार करायचे तर त्यासाठी आवश्यक ते सर्व अन्नधान्य, भाजीपाला, तेल, गॅस या सर्वाचा साठा किती आधीपासून उपलब्ध करून ठेवावा लागला असेल. कारण पूर्ण भारताच्या सुमारे ४०% लोक हे केवळ दीड महिना कालावधीमध्ये या भागात येऊन गेले. सामान्य काळापेक्षा हजारपट जास्त सर्व गोष्टी प्रयागराज-काशी-अयोध्या या परिसरात लागल्या. परंतु या कालावधीमध्ये आलेल्या प्रवाशांना कोणतीही गोष्ट मिळाली नाही असं झालं नाही. यासाठी किती आधी नियोजन करून ठेवावं लागलं असेल! साखर, चहा, दूध, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, गॅस, सिलेंडर, अशा शेकडो गोष्टींचे विचारपूर्वक पूर्व नियोजन केले गेले होते. त्यामुळे हा दीड महिना इतक्या प्रचंड लोकसंख्येचा भार या परिसराने यशस्वीपणे पेलला. केवळ पेलला नाही, तर या संधीचे प्रत्येक व्यावसायिकाने सोने करून घेतले. कोणतीच गोष्ट अनाठाई अधिक दराने विकली गेली नाही मात्र भरपूर प्रमाणात विक्री झाल्यामुळे त्या भागातील व्यवसायिकांनी दोन-तीन वर्षाची कमाई या दीड महिन्यात नक्कीच केली. आणि ती सुद्धा येणाऱ्या भाविकांना समाधान वाटेल अशा पद्धतीने!
भक्तांच्या माथी कुमकुम टिळक लावणारे, चहा विक्री करणारे, भेळ चाट चे विक्रेते, रिक्षावाले, रस्त्यातील दुकानदार, हॉटेल्स, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती करणारे इत्यादी सर्व व्यावसायिकांनी आपल्या क्षमतेची परीक्षा पाहणारे काम केले व भरभरून कमाई देखील केली.
विश्वातल्या कल्पनेपेक्षाही प्रचंड मोठ्या अशा अभूतपूर्व मेळ्याचे आयोजन हा खरोखरच यापुढे जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासाचा व कौतुकाचा विषय राहणार आहे, हे निश्चितच.
कुंभमेळा यशस्वी झाला हे तर सांगण्याची गरज नाहीच. परंतु या कुंभमेळ्यामुळे भारतातल्या सर्व प्रकारच्या धार्मिक आयोजनांमध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात बदल होतील. सर्व ठिकाणी या कुंभमेळ्यातल्या आदर्शांप्रमाणे व्यवस्था ठेवण्याचे प्रयत्न होतील. त्यामुळे भक्तांची देखील सोय होईल. धार्मिक श्रद्धेला मोठे पाठबळ मिळेलच, परंतु एकंदरीत भारतभर धार्मिक पर्यटनामुळे व धार्मिक मेळ्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड प्रमाणात चालना मिळेल असा माझा अंदाज आहे.
या कुंभमेळ्यामध्ये मुळे केवळ प्रयागराज मध्ये दीड महिन्यात तीन लाख कोटी रुपयाची उलाढाल झाली. संपूर्ण भारतभरातून आलेले प्रवासी पाहता भारतभरात याच्या अनेक पट जास्त उलाढाल या कुंभमेळ्यामुळे झाली. याचा परिणाम म्हणून यावर्षीचा भारताचा विकासदर एक टक्क्यांनी वाढलेला दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको.
तेच पोलीस, तेच सरकारी अधिकारी, तेच सरकारी कर्मचारी आणि तेच नागरिक! मात्र नेतृत्व विचारी, विश्वासार्ह व क्रियाशील असेल तर किती मोठा बदल घडू शकतो, याचे हा महाकुंभ हे मोठे उदाहरण आहे.
यामध्ये मुद्दाम उल्लेख करायला हवा अशी जाणवलेली आणखी एक गोष्ट. एकाच वेळी, एकाच ठिकाणी करोडो लोक जमले तर केवळ पोलीस व सरकारी कर्मचारी यांच्या बळावर त्यांना अनुशासित करणे केवळ अशक्य असते. यातूनच अनेक दुर्घटना घडतात. परंतु येथे आलेला सर्व जनसमुदाय हा मुळातच एका धार्मिक उद्देशाने आलेला होता व आपल्याकडून कोणतीही गैर वर्तणूक होणार नाही व आपण पापाचे धनी होणार नाही याची काळजी घेत होता. तसे त्यानां वारंवार आवाहन केले जात होते. पोलीस, सरकारी कर्मचारी हे अथकपणे, उत्तम काम करतच होते. मात्र जमलेल्या भक्तजनांपैकी गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, सर्व जातीपंथांतील लोक हे स्वतःहून चांगले वर्तन करत हा धार्मिक सोहळ्याचा आनंद उपभोगत होते. हे देखील या महाकुंभाच्या सफलते मागील एक महत्त्वाचे कारण आहे, जे भारताच्या इतिहासातील पूर्वानुभव पाहता अनोखे आहे. फार महत्त्वाचे आहे.
उद्या महाकुंभाचे पाचवे व शेवटचे स्नान संपेल तेंव्हा ६६कोटी भाविक प्रयागराज मध्ये येऊन गेलेले असतील. हे वर्षभर आणखीन कैक कोटी भाविक येत रहातील. व हिंदू धर्माकडून एक वैश्विक इतिहास रचला गेला असेल.
२९ जानेवारी रोजी झालेली दुर्घटना हा या कुंभाच्या आयोजनाला लागलेला एक कलंक आहे हे नक्कीच. त्यासाठी नेमके कोण दोषी होते हे शोधून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईलच. परंतु ही घटना वगळता कुंभमेळ्यामध्ये सर्वांचे अनुभव चांगलेच आहेत हे उल्लेखनीय!
जय गंगे! जय यमुने! जय सरस्वती!
जय श्रीराम! जय काशीविश्वनाथ!
श्रीकांत प्रभुदेसाई, इचलकरंजी.