शिक्षणाबरोबरच  विद्यार्थ्यांनी स्किल डेव्हलपमेंट करण्याचे  शिवशाहीर संतोष साळुंके यांचे आवाहन 


नळदुर्ग,दि.०८: प्रा. दिपक जगदाळे 

 घेत असलेले शिक्षण तुम्हाला भविष्यात नौकरी देईल की नाही याची आज खात्री नाही, त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे, यासाठी शिक्षणाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्किल डेव्हलपमेंट करावी असे मत शिवशाहीर संतोष साळुंके यांनी नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले. 

या स्नेहसंमेलनाचे उदघाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव शहबाज काजी   तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाहिर संतोष साळुंके, संस्थेचे सहसचिव प्रकाश चौगुले , यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड आदी उपस्थित होते.  उपस्थित पाहुण्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख आशिष हंगरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

पुढे बोलताना शाहिर संतोष साळुंके यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला हिच भविष्यात प्रेरणा देणारी ठरते. त्यासाठी शिक्षण घेत असताना आपल्या अंगी असलेल्या कलेचा सर्वांगिण विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. कारण हिच कला भविष्यात तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ शकते.                                             

उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉ हाशमबेग मिर्झा यांनी करून दिला. याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व सहसचिव शहेबाज काजी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवशाहिर संतोष साळुंके यांनी सादर केलेला चमके शिवबाची तलवार हा पोवाडा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.  सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार व प्रा. झरीना पठाण यांनी केले. तर आभार डॉ.उद्धव भाले यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात  यश संपादन केले म्हणून त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.   
 
Top