अंगणवाडीचे बांधकाम दर्जाहीन होत असल्याने नागरिकांनी अखेर काम बंद पाडले
नळदुर्ग,दि.१६ : शिवाजी नाईक
नळदुर्ग शहरातील साठेनगर या ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम दर्जाहीन होत असल्याने याविषयी तक्रार करणाऱ्या नागरिकांना कामावर देखरेख करणा-यांनी अरेरावीची भाषा बोलुन दमदाटी केल्याची तक्रार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दि. 13 मार्च रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अंगणवाडीचे काम सुरू केल्यापासून दर्जाहीन होत असल्याची तक्रार करूनही बांधकाम दिवस-रात्र करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. बांधकाम करत असताना बेसमेंटच्या खाली कोणतेही काँक्रीट किंवा बांधकाम न करता थातूरमातूर काम केले असल्याचे नमूद करून दर्जेदार काम करण्याची संबंधितांना सांगितले असता अरे रवीची भाषा करून दमदाटी केल्याचे म्हटले आहे.
नगरपालिकेच्या वतीने शहरात सहा ठिकाणी अंगणवाडीसाठी इमारत बांधकाम सुरू आहे. यापैकी काही ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र साठे नगर येथील अंगणवाडी इमारत दर्जाहीन होत असल्याची तक्रार करत येथील नागरिकांनी हे काम अखेर बंद पाडले.
सुमारे ११ लाख २५ हजार अंदाजपत्रकीय रक्कम असलेले हे काम आहे. दोन महिन्यापासून या कामाबाबत लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्यासह येथील नागरिकांनी या कामाबाबत लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने २६ डिसेंबर २०२४ व ११ फेब्रुवारी रोजी असे दोन वेळा या कामाच्या दर्जाबाबत तक्रार देऊनही पालिका प्रशासनाने या तक्रारीकडे काना डोळा केल्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणचे काम बंद पाडले आहे.
अंगणवाडीचे काम करत असताना कंत्राद्वाराने बेसमेंट साठी आडवा बीम बांधला नाही व पायाही घेतला नसल्याची तक्रार या नागरिकांनी केली असून या तक्रारीची दखल नगरपालिका प्रशासनाने न घेतल्यामुळे न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न शिवाजी गायकवाड यांनी विचारला आहे. तसेच या कामाच्या व पालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरात सुरू असलेल्या व पूर्णत्वाकडे गेलेल्या इतर ठिकाणच्या अंगणवाडीच्या बांधकामावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.