इदं न मम्* माहितीपटाचा,लोकार्पण सोहळा संपन्न ;
उमाकांत मिटकर यांच्या समाजनिष्ठ जीवनप्रवासाचे प्रेरक चित्रण
नळदुर्ग,दि.३०
समाजातील भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील 20 वर्षे संघर्ष केला, प्रसंगी पोलिसांसोबत ज्यांना झुंज द्यावी लागली, अशा एका सामाजिक कार्यकर्त्याची नियुक्ती ‘राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणा’च्या न्यायिक सदस्यपदी होते.
पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध झुंज देणारा कार्यकर्ता एका वळणावर न्यायासनावर आरूढ होतो... असा दैवी न्याय मिळालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य श्री. उमाकांत मिटकर यांच्या कार्याचा परिचय करून देणार्या ‘इदं न मम’ या माहितीपटाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या जन्मदिवसाच्या पुर्वसंध्येला रविवार, दि.30 मार्च 2025 रोजी संभाजीनगर येथे येथे संपन्न झाला.
धाराशिव जिल्ह्यातील वागदरी, अणदूर, नळदुर्ग या परिसरात जन्म व जडणघडण झालेल्या उमाकांत मिटकर यांनी आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा यमगरवाडी येथील भटके विमुक्त समाजाच्या सेवा प्रकल्पावर केला. ‘पालावरची शाळा’ या अभिनव उपक्रमात पुढाकार घेत त्यांनी ही चळवळ सर्वदूर विस्तारली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर यमगरवाडी प्रकल्पावर सामाजिक कार्यात सहभागी असताना त्यांची निवड राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य म्हणून झाली.
श्री. मिटकर यांनी व्यवस्थेविरुद्ध दिलेली झुंज, संवैधानिक पदावर पोहोचल्यानंतर सामान्य माणसाला दिलेला न्याय, ही जबाबदारी पार पाडत असतानाच आपल्या परिसरात घडवून आणलेल्या सुधारणा आदींचा आलेख या माहितीपटात मांडण्यात आला आहे.सध्या त्यांनी समाजातील सुह्रदयी व्यक्तींच्या सहकार्याने वात्सल्य संस्थेच्या माध्यमातुन 150 एकल,विधवा भगिनींच्या पुनर्वसनाचे कार्य हाती घेतले आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, गोव्याचे निवृत्त लोकायुक्त आणि ‘मॅट’चे माजी अध्यक्ष मा. न्या. अंबादासजी जोशी यांच्या शुभहस्ते या माहितीपटाचे लोकार्पण झाले.यावेळी श्री.मिटकर यांनी त्यांना दोन पुरस्कारातून मिळालेली दहा हजार रुपये एवढी रक्कम जीवन विकास ग्रंथालयाच्या वाचन चळवळीसाठी श्री.जोशी यांच्याकडे सुपूर्द केली.
माहितीपटाची संहिता व दिग्दर्शन प्रेरक लेखक दत्ता जोशी यांचे असून याची निर्मिती ‘द कॅटालिस्ट’च्या वतीने करण्यात आली आहे. हा कार्यक्रम मृदगंध कला दालन, सिडको,संभाजीनगर येथे झाला.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.