' नुसतेच बुडबुडे ' म्हणजे जीवनातील विविध समस्यांना अंतर्मुख करण्याची किमया -डॉ. भास्कर बडे
मुरूम, ता. उमरगा, दि. १४ : नुसतेच बुडबुडे हे शीर्षक या काव्यसंग्रहास असले तरी यातील कविता काही क्षणिक फुगणारे बुडबुडे नाहीत, तर त्या मनाच्या तळाशी हलकेच उमटणाऱ्या अर्थपूर्ण लाटा आहेत. अशा लाटा कितीही उमटल्या, तरी त्या प्रत्येक वेळी नव्याने जीवनातील विविध समस्यांना अंतर्मुख करतात हीच या कवितेची खरी किमया असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कथाकार तथा मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर चे माजी कोषाध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर बडे यांनी केले.
उमरगा येथील बहुजन विद्यार्थी वसतिगृहाच्या सभागृहात मराठवाडा साहित्य परिषद, उमरगा शाखेच्या वतीने आयोजित के. पी. बिराजदार लिखित ' नुसतेच बुडबुडे ' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी रविवारी (ता.१३) रोजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर होते. यावेळी भाष्यकार म्हणून आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार, ज्येष्ठ नाट्य लेखक प्रा. हणमंतराव आलुरकर, मुरूमच्या माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महेश मोटे, लातूरचे कथाकार जी. जी. कांबळे, चंद्रकांत भातलोंढे, कविवर्य के. पी. बिराजदार, चित्रलेखा बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. बडे म्हणाले की, कविता वाचताना जीवनातील विविध बारकावे, मनातील हलचाली, समाजातील विसंगती आणि अंतर्मनातील संवेदना यांचा अनुभव येतो. नुसतेच बुडबुडे हे शीर्षक जरी हलकंफुलकं वाटत असलं, तरी त्या बुडबुड्यांतून खोल अर्थ प्रकटला आहे. आजच्या तांत्रिक व वेगवान युगात, माणूस आतून थकला आहे, तुटलेला आहे. अशा वेळी कविताही त्याच्या भावविश्वाशी जोडणारी, त्याला उमज देणारी शक्तीच आहे. या संग्रहातील कविता केवळ शब्द म्हणून न पाहता, त्या वाचून अंतर्मनात उतरवाव्यात. यातून निर्माण होणारे विचार, भावना आणि प्रेरणा हीच या कवितांची खरी देणगी असल्याचे शेवटी ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. महेश मोटे म्हणाले, हा कवितासंग्रह जीवन अनुभव, सामाजिक जाणिवा, ज्वलंत प्रश्न, वास्तवतेचे भान या सगळ्या समस्यांना कवितेच्या माध्यमातून आकार दिला गेला आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह निश्चितच साहित्य प्रेमी व वाचकांना प्रेरणा, उर्जा व बळ देणारा ठरेल.
भाष्यकार डॉ. लक्ष्मण बिराजदार म्हणाले की, नुसतेच बुडबुडे काव्यसंग्रह जगण्यातील वास्तव शब्द रूपाने सांगतो. यामध्ये काही कविता ज्या समाजातील प्रश्नांना भिडतात, तर काही व्यक्तीच्या मनात डोकावतात. वेदना, आनंद, आकांशा, विद्रोह, नात्यांची गुंतागुंत या सगळ्यांनी या कवितांना आकार दिला आहे. त्यामुळे नवलेखकांनी नेहमी लिहीत राहणे, वाचत राहणे आणि शब्दांची ही ताकद जपत राहणे महत्त्वाचे आहे.
या प्रसंगी मनोगतात के. पी. बिराजदार म्हणाले की, माझ्या संपूर्ण जीवन प्रवासात माझे कुटुंबीय, साहित्य प्रेमी, वाचकांचा प्रतिसाद, प्रोत्साहन व सहकार्यामुळे मी निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे साहित्य निर्मिती करू शकलो.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रा. किरण सगर म्हणाले की, एसटी महामंडळातील कंडक्टर ते कविवर्य हा त्यांचा प्रवास निश्चितच साहित्यप्रेमींना प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतर देखील समाजातील ज्वलंत प्रश्न, अन्याय-अत्याचार आणि मानवी भावना यांचे नेमके शब्दांकन या कविता संग्रहात असून माणुसकी, स्नेह, एकटेपणा, विविध समस्या आणि मानवी अस्तित्वाचे प्रश्न यांचा वेध घेणाऱ्या कविता यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. नुसतेच बुडबुडे या शीर्षकातूनच आयुष्यातील विविध समस्या आणि विचारांच्या निसटत्या लहरींची जाणीव करून दिली आहे. हा त्यांचा प्रयत्न निश्चितच इतरांना दिशादर्शक ठरेल.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या मुख्याध्यापक सुभाष वैरागकर, विज्ञान शिक्षक परमेश्वर सुतार, पत्रकार अविनाश काळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहशिक्षक गुंडू दूधभाते यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक सुधीर कांबळे तर आभार मनोजकुमार गुरव यांनी मानले. धम्मचारी प्रज्ञाजीत, प्राचार्य भिमाशंकर सारणे, प्रा. रमेश जकाते, प्रा. डॉ. अवंती सगर, शिला मुदगडे, सरिता उपासे, उषा सगर, रेखा सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, विवेक जाधव, प्रा. विजयकुमार जगताप आदी सह साहित्य प्रेमी, मित्रपरिवार व बिराजदार आप्तस्वकीय बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : उमरगा, ता. उमरगा येथील बहुजन वस्तीगृहात आयोजित ' नुसतेच बुडबुडे ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. भास्कर बडे यांच्या हस्ते करताना किरण सगर, लक्ष्मण बिराजदार, महेश मोटे, हनुमंतराव आलूरकर, कविवर्य के. पी. बिराजदार व अन्य.