अजूनही प्रेम, माणूसकी जीवंत ; तुळजापूर तालुक्यातील सुखद घटना
अणदूर दि.१८ : चंद्रकांत गुड्ड
समाजामध्ये जाती-धर्माच्या भिंती समज-गैरसमजातून रुंदावत चाललेल्या असताना अजूनही प्रेम, माणूसकी,भूतदया जीवंत असल्याची सुखद घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे सोमवारी रोजी घडली आहे.
येथील पाटील तांड्यावरील शेतकरी राजूभाई शेख हे परंपरागत शेतकरी आहेत.त्यांच्या मागील दोन पिढ्या येथे वास्तव्यास आहेत.शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. आपल्या जवळील गाय, बैल, म्हशी, कुत्रे आदीवर जिवापाड प्रेम करुन त्यांचे संगोपन करण्याचा त्यांना छंद आहे.विशेष म्हणजे आपल्या जवळील एकही गाय किंवा बैलाची ते कधीही विक्री करीत नाहीत. जोपर्यंत गाय दुध देते व बैल शेतीच्या कामात चालतो तोपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतात. कांही शेतकरी गाय-बैल म्हातारे झाले की त्यांची कसायाला विक्री करतात.तर कांही शेतकरी आपल्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या वयोमर्यादा संपल्यावरही कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करुन अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ करतात.
माणूसकीची हिच परंपरा राजू यांनी आपल्या आयुष्याच्या पासष्ठितही जोपासली आहे.अगोदरच घरी देशसेवेचे वातावरण होते.त्यांचे दिवंगत वडील चांद शेख यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेतल्याच्या नोंदी आहेत.त्यांनी दिलेली मानवतेची,देशप्रेमाची व प्राणीमात्रांवरील प्रेमाची परंपरा राजूभाई यांनी अविरत सुरु ठेवली आहे.आपल्या ताब्यातील गाय,बैल,म्हैस, कुत्रा यापैकी व्रध्दापकाळाने किंवा अन्य कारणाने निधन झाले की त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची वडीलांनी सुरु केलेली परंपरा आजही सुरु ठेवली आहे.त्यांच्या ताब्यातील सोमवारी(ता.१४) एका बैलाचे निधन झाले होते.त्याच्यांंवर त्यांनी व कुटुंबियांनी विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. आजच्या समाज जीवनात सुरु असलेली उलथापालथ पाहून राजूभाई यांच्याकडून बोध घेणे आवश्यक आहे.
राजूभाई शेख,शेतकरी,अणदूर.
बैल कष्ट करुन जगवतो.गाय,म्हैस दुध देवून आमच्या उदरनिर्वाहासाठी अर्थिक लाभ देवून संसाराचा गाडा चालवितात.आपण आपले आई वडील म्हातारे झाले म्हणून विकत नाही. त्याप्रमाणे जनावरेही आपल्या हयातीत योगदान देतात.त्यांच्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी कसायाला न विकता मी त्यांचा मरेपर्यंत सांभाळ करीत आहे.त्यामुळे आत्मिक समाधान मिळते आहे.
राजूभाई हे अतिशय कष्टाळू व प्रेमळ आहेत.आपल्या मुलाबाळांप्रमाणे जनावरांवर निस्सीम प्रेम करुन काळजी घेतात.हे गेली अनेक वर्षे आम्ही बघतो आहे. त्यांचा आदर्श घेवून आम्हीही आमच्या जनावरांचा अखेर पर्यंत सांभाळ करीत आहोत.आजच्या काळात जन्मदात्या आईवडीलांना न सांभाळणारी मुले पाहून आपल्या जनावरांना त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळणारे हे एक आदर्श पशुपालक आहेत.
योगेश मोकाशे, शेतकरी,अणदूर.