याञात्सव माझ्या गावाची

बालपणाच्या या गोष्टी मनावर अजूनसुद्धा अधिराज्य गाजवून आहेत. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे आमच्या गावची ‘जत्रा’, पूर्वी असा एकही चित्रपट असायचा नाही कि ज्यामध्ये जत्रेचा सीन नसेल,तिथे चित्रपटाची कथाच गावच्या जत्रे भोवती फिरायची.पूर्वीच्या काळी करमणुकीची कुठलीही साधने नसल्याने जत्रेला अनन्यसाधारण महत्त्व होते.

किंबहुना वर्षातून एकदा भरणारी गावची जत्रा अबालवृद्धाचे खास आकर्षण असायचे.वर्षभरातील कष्टाचा संसाराचा रहाटगाड्याचा तान या जत्रेतूनच कमी व्हायचा. ही जत्रा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचीअसते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.बारामहिने कामात असणा-या शेतकरी व काबाड कष्ट करणा-यांना त्यातून थोडा दिलासा म्हणून जत्रेकडे बळीराजा पहात असतो.त्याकाळी नातेसंबंध, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, मैत्री, विश्वास या सार्‍या गोष्टी या इथे पाहायला मिळायच्या. इथे गरीब-श्रीमंत कुठलाही भेदभाव पाळला जात नसे. सगळं वातावरण कसं आनंदी होऊन जायचं. जत्रेच्या निमित्ताने सर्वगावकरी मंडळी एकत्र येत, थट्टा -मस्करी, गप्पागोष्टी होत, असे मनोरंजन होते. भजन-कीर्तन, भारुड, भागवत कथा, तमाशा, लावणी, दिंडी, पालखी अशा अनेक कलेचे सादरीकरण होत असते. अशा कार्यक्रमातुन अध्यात्मीक ज्ञानात भर पडत असते. सर्व मंडळीच्या मनावर अध्यात्मीक संस्कार होत असतात. जञेमधे गमतीदार खेळ खेळले जायचे, शर्यती पाहायला मिळायच्या, काही जत्रेमधून धार्मिक कारणां बरोबरच, आर्थिक वव्यावहारिक उलाढालीसाठी सोयीचे केंद्रही जत्रा असते.

 कधी राजकारण, तर कधी समाजकारणाचेही रंग या जत्रेतून दिसून येतात. जत्रेत हौसे, गवसे, नवसे जातात. एक जत्रेत फिरायचे, नवीन काही पाहायची हौस म्हणून येणारे हौसे, दुसरे जत्रेत काही गवसतेका म्हणून येणारे गवसे आणि तिसरे म्हणजे देवाला अनेक कारणासाठी नवस बोलणारे नवसे.
यानुसार आम्ही पहिल्या वर्गातील म्हणजेच हौसे म्हणून जत्रेला जाणारा पैकी असायचो. संजीवन समाधी म्हणजे एका व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने, खोल ध्यान अवस्थेत प्रवेश करून, आपल्या शारीरिक देहाचा त्याग करणे. याला अनेकदा 'जिवंत समाधी' देखील म्हटले जाते, कारण व्यक्ती जिवंत असतानाच या अवस्थेत प्रवेश करतो. संजीवन समाधी घेणाऱ्या व्यक्तीचा आत्मा आणि शरीर हे एका विशिष्ट स्थितीत प्रवेश करतात, जिथे ते पूर्णपणे विलीन होतात. 

असे संजीवन समाधिस्त श्री घाळेप्पा स्वामीची किर्ती व ख्याती पंचक्रोशीमधे प्रसिद्ध आहे. आमचे आजी आजोबा सांगायचे ज्या वेळी श्री घाळेप्पा स्वामी महाराज जिवंत समाधी घेतली व पुर्ण एक वर्षानंतर जेव्हा त्यांची समाधी काढण्यात आली तेव्हा त्यांचा डावा डोळा ऊघडा होता व समाधी मधे लावलेला दिवा एक वर्षानंतरही तेवत होता असे ते सांगत असत. यावरुन त्यांची अध्यात्मीक एकरुपता व त्यांची देवरुपता लक्षात आल्याशिवाय रहात नाही. श्री घाळेप्पा स्वामी महाराज श्रावण महिन्यात अनुष्ठाण करायचे. अनुष्ठाण करत असताना ते फक्त पुर्ण श्रावण महिना बेलपञी खाऊनच अनुष्ठाण करायचे म्हणुनच आजही दर सोमवारी श्री घाळेप्पा स्वामी महाराजाना साखर, दुध व दुधाची दशमी हाच नैवैद्य चालतो. सोमवारी कोणताही मोठा सण असेल पुरण पोळी बनवली असेल तरी श्री घाळेप्पा स्वामी महाराजाना दुधातील दशमी किंवा दुध साखर हाच नैवैद्य दाखवला जातो व ती परंपरा आजही पाळली जाते.

माझ्या मनात सुद्धा जत्रेच्या खूप आठवणी ताज्या आहेत. माझ्या गावची म्हणजेच “आतनूर” तालुका उदगीर हल्ली तालुका जळकोट येथील ‘श्री काशी विश्वनाथ महाराज व श्री संजीवन समाधी घाळेपा स्वामी महाराज’ यांच्या नावाने भरणारी जत्रा हा एक मोठ्या प्रमाणात भरणारा उत्सवच असायचा. त्यामुळे काही लोक या जत्रेला ‘उत्सव’ यानावाने संबोधतात. हा उत्सव दोन दिवस असायचा, गावातील उत्सवाची नुसती तारीख जवळ आली तरी, गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर चमकलेली दिसत असे. अनेक नाते वाईक मित्र मंडळी या जत्रेच्या निमित्ताने एकत्र यायचे. घरातील वयस्कर मंडळी आपापली लेक, जावई, सुना, नातवंड येणार म्हणून वाट पाहत असायची. या कालावधीत घरातील सगळ्या स्त्रियांची धावपळ उडायची, गावातल्या प्रत्येक घरात सडा-सारवण, रांगोळी यांचा झगमगाट असायचा. पाहुणे मंडळी येणार म्हणून स्वच्छता ठेवली जायची. घराघरात पुरणपोळी, आमरस, खीर, भजी, कुरडयायांचा समावेश असलेले सुग्रास भोजन तयार व्हायचे. गावातील महत्वाच्या ठिकाणी व मंदिरावर रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केली जात असे. उत्सवाच्या कामात चढा ओढीने भाग घेण्यास सर्व समाजातील तरुणांची जणू स्पर्धाच लागलेली असायची. उत्सवाच्या दिवसात सकाळीच कोणीही न उठवता आपोआप जाग यायची. लवकर-लवकर तयार होऊन बसायचो, कधी एकदा उत्सवात जातो, असं व्हायचं. जत्रेत कायकाय घ्यायचं, त्याचा तगादा आईच्या मागे लावायचा. कधी-कधी तिथे गेल्यावर दुसऱ्या वस्तू पाहून मन बदलायचं. मग कशी बशी मनाची समजूत काढून शांत बसायचं.

भंडारा

‘भंडारा’ किंवा ‘परू ’म्हणजे गावातील उत्सवा निमित्त काल्याच्या पहिल्या दिवशी परिसरातील सर्व गावे व तांड्यातील आबाल वृद्धांसहस गळ्यांना महाप्रसादाचे जेवण, या दिवशी परिसरातील सर्व लोक महाप्रसादाचे जेवण घेण्यासाठी एकत्र आमच्या गावी येत असत. हा प्रसाद म्हणजे गव्हाची खीर, वरण व भात, तोही येथेच्छ, असे. गव्हाची खीर बनवण्यासाठी गहू कांढून घ्यावे लागत, चार क्विंटल गव्हाची खीर म्हणजे चार कलई भरून खीर.ही खीर बनवण्यासाठी लोखंडाच्या मोठ्या कलया होत्या, एका कलईत एक पोते गव्हाची खीर बनवली जायची. त्यात खोबरे, इलायची, गुळ यांचा मेळ घालून खीर बनवली जायची. ही खीर म्हणजेच ‘महाप्रसाद’ म्हणून सर्व भक्तांना जेवणाच्या स्वरूपात देण्यात येत असे. हा प्रसाद घेण्यासाठी परिसरातून, गावा गावातून वाडी, तांड्यातून व आमच्या गावातून लहानथोर मंडळीसह सर्वांची गर्दी असायची. त्याकाळी आज सारखे जारचे पाणी वापरले जात नव्हते. आमच्या ‘तिरु नदीचे’ वाहते पाणी लोखंडाच्या बॅरलमध्ये भरून ठेवले जायचे. तेच पाणी स्वयंपाकाला, पिण्यासाठी व इतर वापरासाठी वापरले जात असे. जवळपास चार-पाच हजार लोक गावात येणार म्हणून आमचे आजोबा कैलासवासी शंकराप्पा पंचगल्ले’ आम्हाला घरातील सर्व साठवण्याचे हौद, घागरी, भांडे व्यवस्थित धुऊन नदीचे पाणी घागरीने खांद्यावर आणून पाणी भरा, असा संदेश देत असत. कारण त्या काळी गावात बोअर, विहीर, नळाची पाईप लाईन ही साधने उपलब्ध नव्हती. धुण्यासाठी, जनावरासाठी, पिण्यासाठी एकच नदीचे पाणी उपलब्ध असे. ‘तिरु ’नदीला कधी-कधी दुष्काळ पडल्यानंतर कोरडी व्हायची, अशावेळी आमचे आजोबा शंकरपा पंचगल्ले  ते हे नदीमध्ये लाकडी खोके, पिंपे वाळूत रुतवत असत व त्यातली वाळू बाजूला काढले की झऱ्याचे स्वच्छ पाणी भरून येत असे. त्याकाळी लाईटची सोयही असली तरी तेवढ्या प्रमाणात  नव्हती .मग आम्ही पाणी घागरीत भरत असू आणि भरलेली घागर खांद्यावरून घरी आणत असू. असे हे सर्व गावातील स्त्री-पुरुष लहान-थोर मंडळी सगळेजण करत असत. आता जशी रॉकेलला, बँकेला रांग लागते, तशी नदीतील पाण्याला कधी रांग लागलेली नसे. कारण, वाळूत रुतवलेले डबे, बॅरल, लाकडी खोके एक-दोन नसायचे तर ते पंधरा-वीस असायचे, त्यामुळे जिथे डबा, बॅरल, खोका रिकामा आहे तिथे जाऊन घागरीत पाणी भरून घ्यायचे. आज प्रत्येक गोष्टीत रांगा लागतात तेव्हा या गोष्टीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्याकाळी एकमेकाबद्दल प्रेम-भावना होती. कधी कुणाची अडचण असेल तर ती सोडवणे, त्याला मदत करणे अशी भावना असायची. परिसरातून येणारे लोक  रिकाम्या हाताने प्रसाद घेण्यासाठी यायचे, तेव्हा त्यांना पळसाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळीवर प्रसाद वाढायचा. प्रसाद पूर्ण खाल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी मात्र आमच्या घराकडे वळायचे . तेव्हा आम्ही आमच्या घरात साठवलेले पाणी पिण्यासाठी आवर्जून देत असू, व तसा आजोबाचा आग्रही असायचा. प्रसादासाठी मंदिरा पासून ते आमच्या घरापर्यंत दोन्ही बाजूने रांगा लागायच्या. वाढपी प्रत्येकाला आग्रहाने खीर-खीर असे ओरडत आग्रहाने वाढायचे. कुणालाही कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जायची. आम्ही फक्त पाणी वाढण्याचे काम करत असू.

उत्सव

गावात उत्सवाची तयारी करण्यासाठी गावातील पुढारी माणसे एकत्र येऊन उत्सवात काय-कायकार्य क्रमकरायचे, त्याचे नियोजन करण्यासाठी‘ श्रीकाशी विश्वनाथ महाराज’व‘श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या मंदिरावर एकत्र येत असत. प्रत्येक जण आपआपल्या मनातील विचार मांडत असे. या उत्सवात कोणकोणती कार्यक्रम करायचे, कोणकोणते महाराज कीर्तनासाठी बोलवायचे, त्यांना निमंत्रण देण्यासाठी कोणास पाठवायचे, उत्सवात कायकाय कामे करावी लागणार, व टी कोणा कडून करून घ्यायची, त्यांची जबाबदारी त्यांना सोपवून द्यायची, अशी चर्चा होत असे. गावोगावीचे महाराज बोलावणे, त्यांना निमंत्रण देणे, यांचा समावेश असे. त्याकाळी आजच्या सारखी सोशल मीडियाची सोय उपलब्ध नव्हती.

गावा मध्ये श्री काशी विश्वनाथ महाराजांचे मंदिर लागूनच घाळेप्पा स्वामी महाराजांचे मंदिर व मध्यभागी श्री हनुमाना चे मंदिर हे जवळ जवळ आहेत. या सर्व मंदिरांची स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे, दुरुस्ती करणे अशी कामे प्रामुख्याने अगोदर करावी लागत असत. त्यात रंगरंगोटी मध्ये आमचे सर्व कुटुंब सहभागी होत असे. आमचे आजोबा कैलासवासी शंकराप्पा पंचगल्ले हे कलाकार होते. गावच्या पंच मंडळात त्यांचा सहभाग असे. दिलेले काम चोख व ते पार पाडण्याचा त्यांचा आग्रह असे. आम्ही त्यांना आप्पा असे संबोधत. आमच्या अप्पांना वेशभूषा, रंगभूषा, हस्तकला इत्यादी सारखे गुण अंगी होते. गावात मंदिरावर रोषणाई करणेसाठी त्याकाळी रंगीत कागद वापरले जाई. त्याला‘ताव’म्हणत. अशा कागदाचे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या डिझाईनचे आकर्षक असे कागद कापून गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या खळीने, सुतळीला चिटकवून लांब फरारी तयार करण्याची कला, आमच्या आजोबांच्या अंगी होती. ते काम त्यासाठी मोठ्या आनंदाने करत असत. तसेच त्याकाळी लाईटची सोय नसल्यामुळे, रॉकेलवर चालणाऱ्या पेट्रोमॅक्स होत्या, त्यांना आम्ही‘बत्ती’असे म्हणतअसु. त्यावेळी त्यांना चालण्यायोग्य दुरुस्त करण्याची जबाबदारी ही आमच्या कुटुंबाकडे असायची. तीम्हणजे आमचे काका शिवराजप्पा पंचगल्ले यांना मिळत असे. बत्ती सदुरुस्ती चे काम त्याची नवजर, मेंटल,वायसर, हुबाब त्याचा समावेश होतो असे मेंटल म्हणजे एक कापडी जाळीदार वस्तू पासून बनवलेले असते. 

जे की वायसर हे कातडी पासून बनवलेले असते हुबाब हा प्रकार आता अस्तित्वात नाही. हुबाबब म्हणजे काचेच्या पट्ट्या एका लोखंडी साच्यामध्ये अडकवून-अडकवून गोल असा आकार केलेला असायचा, आणि हा हुबाब त्या  बत्तीच्या प्रकाश देणा-या  जाळी भोवती ठेवला जायचा जेणे करून वाऱ्या पासून संरक्षण होईल व ते वाऱ्यापासून सुरक्षीत राहील. काही काळ चालल्या नंतर बत्ती बंद पडणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या काकावरच असे. त्यासाठी ते एका डब्यात रॉकेल साठवून ठेवत असत. नंतर काळ बदलला तसे गावात लाईटची सोय होत गेली, मग लाईटची ही कामे करण्याची जबाबदारी माझे लहान काका बाबुराव पंचगल्ले त्यांच्याकडे असायची. मंदिरात बल्प, ट्युबलाईट, पंखे लावणे त्यासाठी लागणारे साहित्य वायर, होल्डर बल्प व रोशनाई साठी लागणारी साधने इत्यादी कामे करत असत. मंदिरातील रंगरंगोटीच्या कामात ही आमच्या घराण्यातील सर्वांचा सहभाग असे. माझे वडील वैजनाथप्पा पंचगल्ले हे एक उत्तम कलाकार, उत्तम शिक्षक, उत्तम फोटोग्राफर, उत्तम वक्ते,उ त्तम पेंटर, उत्तम व्यंगचित्रकार व नकलाकार असे हरफन मौलासारखे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व. प्रत्येक गोष्टीत जिज्ञासूपणा, नवनवीन गोष्टी माहीत करून घेण्याची वृत्ती, खोटेपणाचा तिरस्कार, चांगले संभाषण कौशल्य असणारे पट्टीचे शिक्षक..मंदिरावरील व इतर गावातील पेंटिंगची कामे म्हटले की ते कोणताही मोबदला न घेता काम करून देणे, हीच सेवा वृत्ती त्यांच्या अंगी आहे. त्यांच्या अंगी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीके गुण, रोलच्या कॅमेऱ्याद्वारे काढलेले फोटो डेव्हलप करणे म्हणजेच काढलेल्या निगेटिव फिल्मवरून फोटो तयार करणे हे स्वतः चांगल्या पद्धतीने करत असत. त्यानंतर कलर फोटोग्राफी मध्ये सुद्धा त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. ब्लॅक अँड व्हाईट फोटोला कलर मध्ये रुपांतरीत करण्याची कला त्यांच्या अंगीआहे. गावातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमां मध्ये त्यांचा सहभाग नाही असा कुठलाच कार्यक्रम सांगता येत नाही.शिमग्याला टिपरे खेळले जात असत. तेव्हा रंगभूषा व वेशभूषा त्यांच्या शिवाय कुणी ही करू शकत नाही. त्यांचे विद्यार्थी आजही मोठ्या पदावर काम करत आहेत, हे आवर्जून सांगावे लागते. शाळेमध्ये साजरे करण्यात येणारे सण ,त्या सणावर आधारित कार्यक्रम वडीलांशिवाय होतच नसे. गावातील मनोरंजनाचे कार्यक्रम, शाळेतील शिक्षकांचे योगदान खूप मोठे होते. त्यात कोनाळे गुरुजी, मुडपे गुरुजी, हेळंबे गुरुजी, रोडगे गुरुजी, बिचकुंदे गुरुजी, तोडकर गुरूजी यांचे मोलाचे योगदान आहे.

आनंद

गावा मध्ये उत्सवा निमित्त प्रत्येक जण आनंदी असायचा. घरात पै-पाहुण्यांची वर्दळ असायची. परिसरात अनेक गावातून भक्त मंडळी किर्तन, भजन, भारुड ऐकण्यासाठी यायची.काही जण आपल्या अंगी असलेल्या भक्तिमय गुण सादर करत असत. शेजारचे मौजेगव्हाण.मेवापूर,चिंचोली,मरसांगवी,रावणकोळा,नांदेड जिल्ह्यातील मौजे हातराळ,गुंडोपंत,दापका बाराळी, येथून भक्तगण उत्सवा निमित्त हजर राहत असत. ज्यांना कीर्तना मध्ये अभंग गाता येतअसे. ते कीर्तनाच्या कार्यक्रमात ,ज्यांना भारुड म्हणता येते किंवा सादर करता येतं ते संध्याकाळच्या भारुडाच्या कार्यक्रमात, ज्यांना तबला,पेटी,मृदंग वाजता येत,ते त्यात्या कार्यक्रमात हजर असत. ज्यांना फक्त टाळवाजता येते व त्यांना साथ देता येते टाळकरी म्हणून हरिपाठ व कीर्तनास उभे राहात असं.ज्यांना काहीच येत नाही ते ऐकण्यासाठी श्रोते म्हणून हजर राहत असत. वैशाख शुद्ध प्रतिपदेला सप्ताह उभा राहतो.प्रत्येक जण मंदिरात आल्यानंतर श्री काशी विश्वनाथ महाराज श्री घाळेप्पा स्वामी महाराज व हनुमान मंदिर येथे मनोभावे माथा टेकवतो. बेल, फुल, श्रीफळ घेऊन येतो, कुणी साखर, उदबत्ती घेऊन येतो, कुणी घरी केलेल्या गोडा धोडा चे नैवेद्य घेऊन येतो, पण माथा न टेकता प्रत्येकाचे समाधान होणारच नाही. उत्सवासाठी बाहेर गावी कामा निमित्य गेलेले मंडळी आवर्जून आपल्या बाया-पोरासकट हजर असतात. कुणी आपापल्या लेकी, पोरा-बाळांना आमंत्रित करतात. त्यामुळे गावा मध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होते.

मंदिरावर नेमून दिलेले व्यवस्थापक आपापली कामे पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असत. पहाटे ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी हरिपाठ, दुपारी चार वाजता विश्राम. नेमून दिलेल्या अन्नदात्याच्या घरीमहाप्रसाद,पुन्हा संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन व भारुड असा पूर्ण आठ दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम आखला जातो व त्या प्रमाणे सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आता एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्या नंतर आर्थिक बाजूही महत्वाची असते. यासाठी‘ श्री काशी विश्वनाथ महाराज मठ संस्थान’ चे विश्वस्त म्हणून कार्य करणारी मंडळी गावातील प्रत्येक घराला काही देणगी देण्याचे आव्हान करतात.आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जण देणगी देऊन कार्यक्रम कसा चांगल्या पद्धतीने, निर्विघ्न पणे पार पडेल यासाठी आग्रही असत. या विश्वस्ता मध्ये आमच्या आजोबा चे मित्र गावचे पाटीलश्री माधवराव पाटील, श्री गोविंदराव पोलीसपाटील, श्री विठ्ठलराव पाटील,श्री व्यंकटराव पाटील तात्या ,सरपंच व्यंकटराव येवरे, संग्राम शेटकर,नामदेवराव पाटील, संग्राम कल्पे, गुरुनाथ कापसे, बळीराम पत्तीवार ,गोविंदराव शिंदे, संगमनाथ, संगेवार रामराव कदम, नारायणदेव, इत्यादीची प्रामुख्याने नावे घ्यावी लागतात.

नवस

‘श्री घाळपा स्वामी महाराज’ हे एक जागृत देवस्थान म्हणून नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे.श्री घाळप्पा स्वामी महाराज यांनी जिवंत समाधी घेतल्याचे आमचे आजोबा सांगत असत व त्यांच्या भक्तिमय आठवणीही सांगत असत. आजूबाजूच्या गावातून लांबून-लांबून भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे महाराज असल्यामुळे, त्यांची संगमरवराच्या दगडरुपी महादेवाच्या पिंडीला तांदळाचा भात‘ लिंपण’ एक हा प्रकार फार पूर्वीपासून नवस पूर्ण करण्याच्या प्रकारांमध्ये प्रामुख्याने येतो. मंदिरा मध्ये छताला एका ठिकाणी चौकोनी जागा सोडली आहे, त्यातून लहान मुलांना खाली टाकले जाते व काही मंडळी खालच्या बाजूला त्या मुलांना कपड्यांमध्ये झेलतात. अशा प्रकारे नवस फेडला जातो. भक्ती करणाऱ्याला श्री घाळेप्पा स्वामी पावतातच व  अशी धारणा आहे व भक्ताचा विश्वास आहै.

अर्थ

परिसरात बेंड-बत्तासे, पेढे, मिठाई, लाह्या, नारळ, फुले, उदबत्ती इत्यादी चे दुकाने थाटली जात असत. गावात प्रत्येक घरांमध्ये उत्सवासाठी चे खर्चाचे नियोजन पूर्ण वर्षभर केलेलेअसत. विविध प्रकारची खेळणी, ज्योतिषी, शोभेच्या वस्तूची दुकाने मोठ्या प्रमाणावर येत असत. हॉटेल मध्ये गरमागरम भजी, शेव, पापडी इत्यादीची दुकानेही मोठ्या प्रमाणात असत. त्याकाळी काही मंडळी खरेदीसाठी  उत्सवाचा मुहूर्त गाठत असत. त्याकाळी उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती व शेतीवर अवलंबून असणारे छोटे उद्योग, उत्पन्न फार कमी प्रमाणात असायची. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे सुपीक जमिनीचे प्रमाण फार कमी आहे. कधी जास्त पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ, अशा परिस्थितीत हातात येणारे उत्पन्न व खर्चाचा मेळ बसायचा नाही. त्यामुळे खरिपाच्या उत्पन्नावरच पूर्ण वर्षाच्या खर्चाचा मेळ लावणे आवश्यक असायचे. दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे तालुक्याला जाऊन खरेदी करणे शक्य नसल्यामुळे, बाया-बापड्याची कपडे, भांडे, बांगड्या खरेदीसाठी झुंबड उडत असे. या मधून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हातभार लागतअसे.

या सात दिवसात धार्मिक कार्यक्रमांची मेजवानीच असते. या सात दिवसात किर्तन, भजन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, इत्यादी कार्यक्रम होत असत. सप्तमी दिवशी सकाळी पालखी गावातील मुख्य रस्त्यावरून निघते. पालखी मध्ये दिवट्याचा मान एका समाजाला, भालदार-चामान एका समाजाला दिला,चोपदार-चा मान एका समाजाला दिलाजातो.पालखी मध्ये सर्व लहान थोर मंडळी येतात.ही पालखी लेझीमच्या तालावर, टाळ मृदंगाच्या निनादात, गावप्रदक्षिणेसाठी निघते.प्रत्येक जण सडा-सारवण,रांगोळी करून आपले अंगण स्वच्छ ठेवतो व पालखीचे स्वागत करतो.कुणीबेल-फूल वाहून स्वागत करतात,तर कुणी पालखीच्या खालून इकडून तिकडे जाऊनआशीर्वाद घेतात.कुणी फूगडीचा फेरा, धरत टाळकरी वेगवेगळ्या पद्धतीने नाचून टाळ वाजवत असतात. अशा पद्धतीने पालखी वाजतगाजत,टाळ-मृदंगाच्या निनादात पुन्हा मंदिर स्थळी येते. याच दिवशी दुपारी काल्याचे किर्तन होतअसते. गावातील सर्वांच्या घरातून एकत्रित केलेले दही व लाह्या एका मोठ्या माठात जमा करून ते हनुमान मंदिरावर असलेल्या झाडाला टांगले जाते व काल्याचे किर्तन संपत आल्यानंतर विणेकरी आपल्या विनेच्या साह्याने तो माठ फोडतो, तर काही मंडळी माठात हात घालून काल्याचा प्रसाद उंचावरून खाली थांबलेल्या जनसमुदायावर भिरकावतात. कित्येक जण कडक उन्हाळा असल्यामुळे उन्हापासून रक्षणासाठी छत्र्या आणलेल्या असत.त्या छत्र्या उलट्या धरून प्रसाद मिळवण्याचा प्रयत्न करत असत. हे विहंगम दृश्य नक्कीच पाहण्यासारखेच असायचे. सर्वांना एकत्र आणणार आणि एकरूप करणार या समुदायात गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष हे सर्वभेद विसरून एकरूप होऊन जात असत.

प्रा.डाँ.सुधीर वैजनाथराव पंचगल्ले
श्री माधवराव पाटील महाविद्यालय,मुरुम, जि.धाराशिव

 
Top