उमाकांत मिटकर यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान ; डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचा उपक्रम

नळदूर्ग,दि.२६:
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नळदूर्गचे सुपूत्र तथा राज्य पोलिस प्राधिकरणचे  उमाकांत मिटकर यांना प्रदान करण्यात आला. 

या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री  जयकुमार गोरे, आयुष्मान भारत महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष  ओमप्रकाश शेटे,एबीपी माझा च्या सरिता कौशिक, संघटनेचे अध्यक्ष  राजा माने यांची याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थिती होती. 

भटके विमुक्त समाजाच्या कल्याणासाठी  मिटकर यांच्या माणुसकीचा समाजस्पर्श लाभलेल्या कार्याला हा मानाचा मुजरा आहे.समाजात अनेक समस्या आहेत. प्रत्येक समस्येवर प्रत्येकच जण तोडगा काढू शकणार नाही. पण भटक्या विमुक्त समाजाच्या उत्थानामध्ये  उमाकांत मिटकर यांच्यासारख्या समाजसमर्पित व्यक्तीकडून मिळणारे योगदान दीपस्तंभासारखे आहे,असे याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पत्रकारिता व अन्य विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणार्‍या मान्यवरांचा गौरव दरवर्षी महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन करण्यात येत असतो. यंदाचा हा सोहळा रविवारी, 25 मे रोजी पुणे येथे पार पडला. उद्योग, समाजसेवा, आदिवासी विकास, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यात सहभाग होता.

उमाकांत मिटकर यांच्या समाजनिष्ठ वाटचालीची कथा मांडणारे ‘डिव्हाईन जस्टिस’ हे पुस्तकही मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून प्रकाशित झालेले असून त्यांच्या कार्याची माहिती देणारा ‘इदं न मम’ हा माहितीपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.
 
Top