पाणीपुरवठा,  स्वच्छता व दिवाबत्तीचे कामे  न झाल्यास  कुलूप ठोकुन रास्ता रोको आंदोलनचा इशारा 

नळदुर्ग,दि..१६ :

नळदुर्ग शहरातील पाणीपुरवठा, शहर स्वच्छता व दिवाबत्तीची कामे व्यवस्थित न झाल्यास नगरपालिकेच्या इमारतीस कुलूप लावून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासन विरोधात गाढव मोर्चा काढून न.प. प्रशासनाचा निषेध करुन मोर्चेक-यांनी दिला.
शहरात मागील पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांनी सोमवार  रोजी नगर पालिका प्रशासन विरोधात गाढव मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला. राजेंद्र रोमन यांनी आंदोलन कर्त्यांना लेखी आश्वासन दिले.

 तत्पूर्वी ऐतिहासिक किल्ला गेट येथून सकाळी १०.३० वाजता गाढव मोर्चास सुरवात करण्यात आली. मोर्चात सहभागी नागरिकांनी हातात फलक घेत प्रशासनाचा निषेध केला तर गाढवाच्या गळ्यात मुख्याधिकारी नावाची पाटी अडकवली. क्रांती चौक, चावडी चौक, बसवेश्वर चौक,जय भवानी चौक, शास्त्री चौक मार्गे हा मोर्चा नगर पालिका येथे आल्यानंतर सहभागी सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 यामध्ये प्रमोद कुलकर्णी, ज्योतिबा येडगे, मुन्ना शेख,अझहर जहागीरदार, शिवाजी गायकवाड, सरदारसिंग ठाकूर, संतोष पुदाले, सतीश पुदाले, मुकुंद नाईक, शहाबाज काझी, कमलाकर चव्हाण यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या कामावर टीका केली.  तसेच भविष्यात पाणीपुरवठा, शहर स्वच्छता व दिवाबत्तीची कामे व्यवस्थित न झाल्यास नगरपालिकेच्या इमारतीस कुलूप लावून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.  नळदुर्ग पोलीसांनी आंदोलनादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
Top