नळदुर्ग जि.प.कें. प्राथमिक शाळेस अच्छे दिन. विद्यार्थी संख्या वाढीसह अपेक्षाही वाढल्या
नळदुर्ग,दि.१७:
नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवगतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ,मिष्ठांन्न व शालेय पाठ्यपुस्तके देत स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक भास्कर मस्के, सहशिक्षक बिलाल सौदागर, राहुल खोडके, सुंदर भालकटे, वंदना चौधरी, सुरेखा मोरे, जयश्री धुमाळ, प्रीती भंडारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय डुकरे, पालक राम सातपुते, नव्याने दाखल झालेले विद्यार्थ्यांचे पालक संतोष पुदाले, प्रमोद कुलकर्णी यांच्यासह इतर पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
एकीकडे परिसरातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थी अभावी दुरावस्थेत असताना नळदुर्ग जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस मात्र पालकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कारण या शाळेतील शिक्षक, शिक्षिका गुणवत्तेला प्राधान्य देत आहेत. यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संतोष पुदाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव प्रमोद कुलकर्णी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सचिव तानाजी जाधव, महावितरणचे तत्पर कर्मचारी सागर कौरव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करत विश्वास दाखवला आहे. यामुळे जि.प.कें. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची व शिक्षकांची जिम्मेदारी व शाळेकडून पालकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तसेच सध्या पेव फुटलेल्या व मनावर गारुड घातलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत स्पर्धा करण्याच्या दृष्टीने इंग्रजी व गणित विषयात विद्यार्थ्यांना रस निर्माण करणे आवश्यक आहे. असे मत पालक तथा पत्रकार भगवंत सुरवसे यांनी व्यक्त केले.